मुंबई (Mumbai) : वाहतुकीस अडथळा ठरत असलेली बदलापूर ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यानची रेल्वे फाटके बंद करून त्याठिकाणी १० उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. सध्या या उड्डाणपुलांच्या परीक्षण व मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे.
रेल्वेची वाहतूक विनाअडथळा व्हावी, यासाठी २०१५ पर्यंत मुंबई ते पुणे या मार्गावरील सर्व रेल्वे फाटके बंद करून रेल्वे उड्डाणपूल उभारण्याची घोषणा मध्य रेल्वेच्या तत्कालीन महाप्रबंधकांनी केली होती. मात्र अद्याप यासंदर्भात कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी ही स्थानके उड्डाणपुलाअभावी त्रस्त झालेली आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूरच्या पुढे वांगणी ते कर्जत पट्ट्यात गेल्या दशकाभरात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचबरोबर वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यात या रेल्वे स्थानकात रेल्वे उड्डाणपूल नसल्याने शहराच्या पूर्व पश्चिम भागात ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना रेल्वे फाटकातून जावे लागते.
लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या, मालगाड्या व लोकल गाड्या रेल्वे स्थानकात येताना व रेल्वे स्थानकातून जाताना ही रेल्वे फाटके बंद असतात. त्यामुळे या गाड्या जाईपर्यंत वाहनचालकांना रेल्वे फाटकात थांबून राहावे लागते. असल्याने वाहनांची गर्दी झाल्यास अनेकदा वाहनकोंडीही होत असते. नागरिकांची होत असलेली ही गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीस अडथळा ठरत असलेली वांगणी ते कर्जत रेल्वे स्थानकादरम्यानची सर्व रेल्वे फाटके बंद करून त्याठिकाणी उड्डाणपूल उभारावेत, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्यावतीने रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने बदलापूर ते कर्जत या रेल्वे मार्गावर १० उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या उड्डाणपुलांच्या परीक्षण व मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे कोकण विभाग मुख्य अभियंता शरद राजभोग यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून या कामाला अधिक गती मिळावी, आणि लवकरात लवकर रेल्वे उड्डाणपुलांची उभारणी होऊन नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने व्यक्त केली आहे.