मुंबई (Mumbai): राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया (DPIA) प्रकल्पाच्या उभारणीत आता मोठी प्रगती पाहायला मिळणार आहे. नामांकित 'रामकी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' कंपनीने या प्रकल्पासाठी तब्बल १,४०१.८४ कोटी रुपयांचे ईपीसी (EPC) टेंडर पटकावले आहे.
महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड (MITL) सोबत झालेल्या या करारानुसार, रामकी इन्फ्रास्ट्रक्चर रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्राच्या पहिल्या टप्प्यातील कामांची जबाबदारी सांभाळणार आहे.
महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड ही भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या इक्विटी सहभागातून स्थापन केलेली एक विशेष उद्देश वाहन (Special Purpose Vehicle - SPV) आहे. या संस्थेची स्थापना महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील 'दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया' (DPIA) च्या 'पार्सल बी' (Parcel B) विकसित करण्यासाठी करण्यात आली आहे.
दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया हा केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून साकार होत असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. रामकी इन्फ्रास्ट्रक्चरला मिळालेल्या या कामामुळे रायगड जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे.
असा आहे प्रकल्प
कामाचे स्वरूप : डिझाइन, इंजिनिअरिंग, बांधकाम, टेस्टिंग आणि कार्यान्वित करणे.
कालावधी : काम सुरू झाल्यापासून ९३० दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट.
देखभाल : प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील ४ वर्षे त्याचे ऑपरेशन आणि मेंटेनन्स (O&M) देखील कंपनीच पाहणार आहे.
काय सुविधा उभारल्या जाणार?
या प्रकल्पामुळे दिघी पोर्ट परिसरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होतील. यात प्रामुख्याने पुढील गोष्टींचा समावेश असेल:
अत्याधुनिक रस्ते आणि संबंधित संरचना.
पाणीपुरवठा आणि जलशुद्धीकरण केंद्रे.
सांडपाणी व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रणाली.
वीज वितरण जाळे आणि माहिती तंत्रज्ञानासाठी (ICT) युटिलिटी डक्ट्स.
हे कंत्राट आमच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब करणारे आहे. दिघी पोर्ट हा एक अत्यंत महत्त्वाचा औद्योगिक कॉरिडॉर असून, आम्ही आमच्या इन-हाउस तंत्रज्ञानाचा वापर करून तो वेळेत पूर्ण करू. यामुळे या भागात उद्योग उभारणाऱ्या कंपन्यांना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा मिळतील.
- सुनील नायर, सीईओ, रामकी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड