Narendra Modi
Narendra Modi Tendernama
मुंबई

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा झंझावात आज विदर्भात; महाराष्ट्राला काय देणार गिफ्ट?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (ता. 28) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. 4,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि सिंचनाशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान सायंकाळी 4:30 वाजता यवतमाळ येथे करणार आहेत.

राज्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी रेल्वे मार्ग, रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी वर्धा – नांदेड या नवीन रेल्वे मार्गावरील 645 कोटी रुपये खर्चाच्या वर्धा ते कळंब (जि. यवतमाळ) या 39 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग व अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील 645 कोटी रुपये खर्च आलेल्या न्यू आष्टी ते अंमळनेर (जि. बीड) या 32.84 किलोमीटर लांब रेल्वे मार्गाचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

तसेच वर्धा- कळंब स्टेशनपर्यंत नवीन रेल्वेला व अंमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीत डेमू रेल्वे सेवेचा आरंभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे.

रस्ते प्रकल्पांमध्ये 291 कोटी खर्चाच्या साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंत 55.80 किलोमीटर दुपदरी रस्ता काम, 378 कोटी रुपये खर्च असलेल्या सलाई खुर्द – तिरोडा (जि. गोंदीया) महामार्गावरील 42 किलोमीटर लांबीच्या क्राँक्रिटीकरण रस्ता काम, तसेच 483 कोटी रुपये खर्च आलेल्या वरोरा – वणी (जि. यवतमाळ) महामार्गावरील 18 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

घरकुल योजनेचा नारळ
पंतप्रधान आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या 10 लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षांत घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा नारळ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील कार्यक्रमात फुटणार आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 ते 2025-26 दरम्यान एकूण 10 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. 2023-24 मध्ये मंजूर 3 लाख घरकुल लाभार्थ्यांपैकी 2 लाख 50 हजार लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या हप्त्याच्या 375 कोटी रुपये निधीचे वितरण होणार आहे. राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून 17,00,728 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 7,03,497 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.

‘सर्वांसाठी घरे’ या ध्येयपूर्तीसाठी राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामात गतीमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “महा आवास अभियान 2023-24” अंतर्गत 7 लाख घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत.