मुंबई (Mumbai) : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात वीजपुरवठा खंडित होऊ नये, याकरिता वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत १६१२ कोटींचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. यामधून जिल्ह्यात ऊर्जा सक्षमीकरणाचे कामे करण्यात येतील, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर- साकोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
पालघर जिल्ह्यातील वीज पुरवठाबाबत सदस्य विलास तरे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य राजेंद्र गावित यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला. या संदर्भात ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर - साकोरे म्हणाल्या, वसई, पालघर तालुक्यातील आदिवासी गावांना वीज पुरवठा नियमित करण्यासाठी ढेकाळे ३३ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. यासाठी पाटबंधारे विभागाची जागा अत्यल्प भाडेदरात मिळाली आहे. या जागेवर उपकेंद्र पुढील वर्षभरात उभारण्यात येईल.
पालघर जिल्ह्यात १३१ केव्ही क्षमतेचा जव्हार उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. सूर्यनगर येथील १३२ केव्ही क्षमता असलेल्या उपकेंद्राचे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहे. डहाणू ते दापचरी वीज वाहिनीचे काम पूर्ण करण्यात येईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सहा उपकरणांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.