Railway
Railway Tendernama
मुंबई

रेल्वेच्या 'त्या' टेंडरला झिरो रिस्पॉन्स! कंपन्यांनी का फिरवली पाठ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रेल्वेने अतिरिक्त महसूल मिळण्यासाठी रेल्वे स्थानकांच्या नावात कंपन्यांची नावे किंवा लोगोची जाहिरात करण्यासाठी काढलेल्या टेंडरला शून्य प्रतिसाद मिळाला आहे. कंपन्यांना रेल्वे स्थानकाच्या इमारतीत, तसेच पॅसेंजर सर्क्युलेटिंग एरियामध्ये जेथे जेथे स्थानकाचे नाव असेल तेथे को-ब्रॅंडिंग करता येते. मात्र या टेंडरमध्ये रेल्वेने काही अटी खूपच जाचक ठेवल्या होत्या. त्यासोबतच मेट्रोच्या स्थानकांप्रमाणे रेल्वेच्या स्थानकांमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि प्रवाशांना योग्य सेवा मिळत नसल्यानेच कंपन्यांनी या टेंडरकडे अक्षरश: पाठ फिरवली आहे.

भारतीय रेल्वेने अतिरिक्त महसूल मिळविण्यासाठी स्थानकांच्या नावात उत्पादक कंपन्यांच्या नावाचा किंवा लोगोचा समावेश करण्याची योजना जाहीर केली आहे. मात्र त्याला कंपन्यांकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने ही योजना फसल्यात जमा आहे. यामागे नवनव्या कल्पना राबविण्यात पुढे असलेल्या पश्चिम रेल्वेलाही अद्याप एकाही स्थानकाचे नाव कंपन्यांच्या नावाने बदलण्यासाठी कंपन्यांकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकाच्या इमारतीत तसेच पॅसेंजर सर्क्युलेटिंग एरियामध्ये जेथे जेथे स्थानकाचे नाव असेल तेथे को-ब्रॅंडिंग करता येईल, परंतु रेल्वे तिकीट, पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम, वेबसाईट, रूट मॅप, अनाऊन्समेंट पब्लिक सिस्टीम, रेल्वे डिस्प्ले नेटवर्क यावर कंपन्यांना त्यांचे नाव लिहिता येणार नाही.

स्थानकांची नावे उत्पादक कंपन्यांच्या नावाने बदलण्यासाठी रेल्वेने अटीही खूप जाचक ठेवल्या होत्या. ब्रॅंड ओनरना रेल्वे स्थानकांच्या नावाच्या पुढे किंवा मागे दोनच शब्दांत आपल्या कंपनीचे नाव लिहावे किंवा लोगोचा समावेश करावा, असे टेंडर काढताना रेल्वेने स्पष्ट केले होते. तसेच ज्या स्थानकांना महापुरुषांची, प्रभावी व्यक्तींची, राजकीय नेत्यांची, तसेच शहीदांची नावे असतील तेथे को-ब्रॅंडिंग करता येणार नाही. तसेच अल्कोहोल, सिगारेट, तंबाखू, ड्रग्ज, तसेच कायदेशीर मान्यता नसलेल्या कोणत्याही उत्पादनांची जाहिरात करता येणार नसल्याचेही रेल्वेने म्हटले होते.