Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

ग्रामीण रस्ते आणि शाळांच्या विकासासाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सहकार्य

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यात ग्रामीण भागामध्ये सिमेंट काँक्रीटचे दर्जेदार रस्ते, अन्य महामार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासाकरिता न्यू डेव्हलपमेंट बँक सहकार्य करणार आहे.

न्यू डेव्हलपमेंट बँकेचे भारतीय प्रादेशिक कार्यालयाचे महासंचालक डॉ डी.जे पांडियन यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथिगृह येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बँकेच्या शिष्टमंडळांसोबत विविध क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्याला १ हजार अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था करायची आहे. यासाठी राज्यात गतिमान दळणवळणाची व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. तसेच शैक्षणिक सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी पायाभूत व्यवस्थाही उभी करावी लागणार आहे. यासाठी न्यू डेव्हलपमेंट बँक राज्याला भरघोस आर्थिक मदत देईल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

नवीन शैक्षणिक धोरण राज्याने अवलंबिले आहे. या धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याचा कौशल्य विकास करण्यात येत आहे. कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी उन्नत होऊन राज्याला वेगाने विकसित करण्यासाठी हातभार लागणार आहे. शाळांचा विकास झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला तिथे पोहोचण्यासाठी दर्जेदार रस्त्यांचीही गरज आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून 'सीएम श्री इन्स्टिट्यूशन' हा शाळांच्या सर्वांगीण विकासासाठीचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र अमृतकाळ रस्ते विकास योजना, ग्रामविकास विभाग राज्यात ग्रामीण भागात सिमेंट काँक्रीट रस्ते विकास प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. बँकेच्या शिष्टमंडळात बँकेचे भारतीय प्रदेश कार्यालयाचे महासंचालक डॉ. पांडियन यांच्या समवेत पब्लिक सेक्टर विभागाचे महासंचालक युरी सुरकोव्ह, सीनियर प्रोफेशनल बिंदू माधव पांडा, प्रिन्सिपल प्रोफेशनल बिन्तेश कुमार, ' मित्रा 'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंग देओल, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.