मुंबई (Mumbai): राज्याच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर या भागांना अधिक वेगाने जोडण्यासाठी नेरळ–वांद्रे–पाईट–शिरोली–पाबळ–मळठण–शिरूर या १३४ कि.मी. लांबीच्या नवीन चौपदरी महामार्ग प्रकल्पाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
सध्या पुणे-शिरूर मार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. या नवीन महामार्गामुळे ही कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे पुणे आणि नगर जिल्ह्याचा मुंबई तसेच जेएनपीटी (JNPT) बंदराशी थेट संपर्क निर्माण होईल. यामुळे मालवाहतूक अधिक वेगवान होऊन वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होणार आहे.
औद्योगिक क्षेत्राचे भाग्य उजळणार
हा महामार्ग केवळ प्रवासासाठीच नाही, तर उद्योगांसाठीही 'लाईफलाईन' ठरणार आहे. या मार्गाचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना होणार आहे, ज्यात प्रामुख्याने खेड एसईझेड आणि तळेगाव, चाकण आणि रांजणगाव, सुपा औद्योगिक क्षेत्र या क्षेत्रांचा समावेश आहे.
या प्रकल्पामुळे खेड, शिरूर, आंबेगाव आणि मावळ परिसरातील विकासाला नवी गती मिळेल. उद्योग, नवीन गुंतवणूक आणि पर्यायाने रोजगाराच्या लाखो संधी या पट्ट्यात निर्माण होणार आहेत.
अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी विशेष रस घेतला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि दूरदृष्टीमुळे या प्रकल्पाचा आराखडा तयार होऊन त्याला शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यांच्या संकल्पनेतील हा मार्ग आता प्रत्यक्ष साकारला जाणार असून, रायगड ते थेट मराठवाड्यापर्यंतच्या दळणवळणाचे चित्र यामुळे बदलणार आहे. तसेच या महामार्गामुळे भविष्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी होणार असून, हा प्रकल्प राज्याच्या प्रगतीचा नवा महामार्ग ठरणार आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
एकूण लांबी: १३४ किलोमीटर.
स्वरूप: सुसज्ज चौपदरी महामार्ग.
प्रमुख गावे/टप्पे: नेरळ, वांद्रे, पाईट, शिरोली, पाबळ, मळठण आणि शिरूर.
प्रमुख फायदे: औद्योगिक पट्ट्यांचे सक्षमीकरण, कृषी मालाची जलद वाहतूक आणि पुणे-नगर महामार्गावरील ताण कमी होणे