Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) Tendernama
मुंबई

Navi Mumbai : महापालिका 'या' ठिकाणी उभारणार बहुमजली वाहनतळ, वाणिज्य संकुल; लवकरच टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सिडकोने बेलापूर व वाशी येथे दिलेल्या सार्वजनिक वाहनतळ भूखंडावर आता सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर बहुमजली वाहनतळासोबत वाणिज्य संकुल उभारण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच या कामासाठी टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेला सार्वजनिक वाहनतळ उभारणीसाठी सिडकोने बेलापूर सेक्टर-१५ येथे तब्बल ६७६० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड क्र.७२ हा राखीव किंमतीच्या २५ टक्के दराने म्हणजेच १ कोटी १८ लाखाला ऑगस्ट २०१५ व वाशी सेक्टर-३०ए येथे तब्बल ११९०४ चौ.मीटर क्षेत्रफळाचा भूखंड क्र. ३६ ए हा राखीव किंमतीच्या २५ टक्के दराने म्हणजेच ५ कोटी ९८ लाख ४६ हजाराला सफ्टेंबर २०१८ मध्ये वितरित केला होता. ३१ जानेवारी २०२४ रोजी तत्कालीन नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी बेलापूर व वाशी इथल्या वाहनतळाच्या भूखंडावर बहुमजली वाहनतळ व वाणिज्य संकुल उभारण्यासाठी सिडकोकडे ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती.

भूखंडाच्या वापर बदलास सिडकोच्या विकास नियमावली व २०२० च्या युडीसीपीआरमधील तरतुदीनुसार धोरण नसल्याचे सिडकोचे म्हणणे आहे. परंतु, एनएमएमटी उपक्रमास दिलेल्या बसडेपो व बस टर्मिनलच्या भूखंडाचा वाणिज्य वापर करण्यास सिडकोने नवी मुंबई परिवहन उपक्रमास परवानगी दिली होती. याचाच आधार घेत अखेर सिडकोने सार्वजनिक वाहनतळाच्या भूखंडाचा वापर बदल करण्यास तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र देऊन नवी मुंबई महापालिकेस बहुमजली वाहनतळ व वाणिज्य संकुल उभारण्यास मंजुरी दिली आहे. सिडकोने संबंधित भूखंडाच्या वाणिज्य वापरातून महापालिकेला मिळणाऱ्या नफ्याच्या उत्पन्नातील २५ टक्के हिस्सा सिडकोला देण्याच्या अटीवर महापालिकेला भूखंडाच्या वापर बदलास तात्पुरते ना हरकत प्रमाणपत्र (प्रोव्हीजनल एनओसी) देण्याचा निर्णय सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे.