Kashedi Tunnel
Kashedi Tunnel Tendernama
मुंबई

Mumbai Goa Highway : आता कशेडी घाट 15 मिनिटांतच सुसाट! अखेर बोगद्याची सिंगल लेन...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : गणेशोत्सवापूर्वी कशेडी टनेलची (Kashedi Tunnel) सिंगल लेन सुरू करणारच असे वचन आपण सर्व कोकणवासीय बंधू-भगिनींना दिले होते. हे एक आव्हानच होते, परंतु हा शब्द पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली व युद्धपातळीवर काम केले. अधिकारी, तंत्रज्ञ व कर्मचारी यांचा प्रामाणिक प्रयत्न आणि एकजुटीमुळेच विक्रमी वेळेत हे काम पूर्ण होवू शकले, असे उद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी काढले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी कशेडी बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. पोलादपूर (जि. रायगड) मधील भोगाव ते खेड (जि. रत्नागिरी) तालुक्यातील कशेडी हे अंतर पार करण्यासाठी आजवर सुमारे ४५ मिनिटे वेळ लागायची. पण आता कशेडी बोगदा सिंगल लेन वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून, या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. अशा या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत कापता येणार आहे, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

कोकणात गणपतीसाठी वाहनाने जाणारे गणेश भक्त व चाकरमानी प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल. कोकणवासीय बंधू-भगिनींना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचे समाधान असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. उद्घाटन झाल्यावर बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ वृक्षारोपण करण्यात आले.

सिंगल लेनचे ९०% पेक्षा अधिक काम पूर्ण
मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. सध्या काँक्रिटीकरणाच्या या कामातील महत्त्वाचा क्युरिंग पिरियड सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. १५ सप्टेंबरनंतर कोकणवासी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जायला निघतील; त्यापुर्वीच या सिंगल लेनवरून वाहतूक खुली करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या आणि विशेषतः वाहन चालकांच्या सोयीसाठी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी चहा-पाण्याची व्यवस्था, शौचालय सुविधा, पोलिस मदत कक्ष, वाहनचालकांसाठी आराम कक्ष अशा अत्यावश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात येत आहेत, याचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते खारपडा येथे करण्यात आले.