मुंबई (Mumbai): मुंबई शहराला भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विविध पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्यात येत असून विक्षारीकरण प्रकल्प, गारगाई धरण तसेच दमणगंगा - पिंजाळ नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदस्य प्रवीण दरेकर व राजहंस सिंह यांनी चर्चेत सहभाग घेतला.
मुंबईची दररोजची पाण्याची गरज सुमारे ४६६५ दशलक्ष लिटर असून सध्या ४१०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. मोडक सागर, वैतरणा, भातसा आणि तुळशी या धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर २०४१ पर्यंतच्या गरजा लक्षात घेऊन नवीन प्रकल्पांना चालना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी’ या योजनेअंतर्गत मे २०२२ पासून झोपडपट्टी, गावठाण व कोळीवाडा परिसरात २५ हजार १०१ नवीन जलजोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच ४०७७ कोटी रुपये खर्चाचा ४०० दशलक्ष लिटर क्षमतेचा विक्षारीकरण (डिसॅलिनेशन) प्रकल्प हाती घेण्यात येत असून त्याचा कालावधी चार वर्षांचा आहे, असे त्यांनी सांगितले.
गारगाई धरण प्रकल्पामुळे ४४० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठ्यात वाढ होणार असून या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय दमणगंगा–पिंजाळ नदीजोड प्रकल्पालाही अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले असून त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील पाणीपुरवठा बळकट होणार आहे.
जुनी पाईपलाईन बदलणे, गळती रोखणे तसेच अनधिकृत पाणीउपसा याबाबत आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना महानगरपालिकेला देण्यात येतील, असेही मंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी त्यांनी यावेळी सांगितले.