Nala Safai
Nala Safai Tendernama
मुंबई

Mumbai : नालेसफाईच्या टेंडरमध्ये हेराफेरी करणारा 'तो' ठेकेदार ब्लॅकलिस्टेड

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : खोटी कागदपत्रे सादर करून मुंबई महापालिकेच्या नालेसफाईचे टेंडर मिळवणाऱ्या मैनदीप एंटरप्रायजेस या कंत्राटदाराला महापालिकेने आता कायमचे काळ्या यादीत टाकले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार ऍड. अनिल परब यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली.

आमदार म्हणून अधिकार असताना महापालिका आयुक्तांनी आमदार अॅड. अनिल परब यांना भेट नाकारली होती. शिवाय तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांनीदेखील विधान परिषदेत चुकीची माहिती सादर केली होती. त्यामुळे महापालिका आयुक्त आणि संबंधित मंत्र्यांविरोधात अॅड. अनिल परब यांनी विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. या पार्श्वभूमीवर त्यांची महापालिका आयुक्तांसोबत बैठक झाली. खोटी कागदपत्रे करणाऱ्या मैनदीप एंटरप्रायजेस कंपनीवर 'एफआयआर' नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेने आता 'एफआयआर' नोंदवून त्याला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकल्याची माहिती दिल्याचे ते म्हणाले. तसेच महापालिकेच्या सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवण्याच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही परब यांनी केला होता. आता हा सॅनिटरी नॅपकीन मशीन बसवण्याचा उपक्रम तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढे राबवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या माहीम येथील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणात 17 झोपडीधारकांवर चुकीच्या धोरणामुळे बेघर होण्याची वेळ आली होती. या झोपडीधारकांना बिल्डरच्या स्किमनुसार हक्काची घरे देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संबंधित सर्व 17 झोपडीधारकांना हक्काची घरे देण्यात येतील, असे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आल्याचे परब यांनी सांगितले.