Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

या भागाच्या कनेक्टिव्हिटीसाठी बीएमसी उभारणार २१८ कोटींचा केबल पूल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : भायखळा पूर्व-पश्चिमला जोडण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल 218 कोटी रुपये खर्च करून केबलचा उड्डाणपूल बांधणार आहे. मुंबई महापालिका व मुंबई रेल्वे इफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या माध्यमातून पुलाचे काम होणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्धिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे.

महापालिका रेल्वेकडून हा पूल बांधून घेणार आहे. अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील 'हिमालय' पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नव्याने तर नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत. यामध्ये भायखळा पूर्व व पश्चिमेला ये जा करणाऱ्या लोकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी केबलचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

या कामात 9.7 मीटर उंच व 916 मीटर लांब पुलाचा विस्तार करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका व मुंबई रेल्वे इफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या माध्यमातून पुलाचे काम होणार आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्धिष्ट असल्याचे पालिकेच्या पूल विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे भायखळा परिसरातील वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार आहे.