Doctor
Doctor Tendernama
मुंबई

कंत्राटी डॉक्टरांसाठी मुंबई महापालिकेला वर्षाकाठी एक कोटींची 'भूल'

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कांदिवली (Kandivali) येथील शताब्दी आणि बोरीवली (Borivali) येथील भगवती रुग्णालयासाठी कंत्राटी पद्धतीने भूलतज्ज्ञांची सेवा घेण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने (Mumbai Municipal Corporation) त्यापोटी 1 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात 2014 पासून कंत्राटी पद्धतीने भूलतज्ज्ञांची नियुक्ती केली जात आहे. महानगर पालिकेत तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने ही नियुक्ती केली जात आहे. त्यातच कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी आणि बोरीवली येथील हरीलाल भगवती रुग्णालयाचे समायोजन व विलिनीकरण झाले आहे. भगवती रुग्णालयात उपलब्ध नसलेल्या सुविधा शताब्दी रुग्णालयामार्फत पुरवल्या जातात. शताब्दी रुग्णालयात भूलतज्ज्ञांची आठ मंजूर पदे आहेत, त्यातील फक्त दोन पदे भरलेली असून सहा पदे रिक्त आहेत, अशी माहिती महानगर पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे.

या रुग्णालयात साधारणत: दिवसाला 20 ते 25 शस्त्रक्रिया होतात. या शस्त्रक्रियांसाठी तज्ज्ञ भूलतज्ज्ञांची आवश्‍यकता असते. महानगर पालिकेकडे पूर्णवेळ भूलतज्ज्ञ नसल्याने शस्त्रक्रियांमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. आवश्‍यकतेनुसार खासगी कंपनीकडून पालिकेला भूलतज्ज्ञ पुरवले जातात. वर्षासाठी 1 कोटी रुपयांचे मानधन यासाठी पालिकेला द्यावे लागत आहे. पश्‍चिम उपनगरातील इतर रुग्णालयातही अशाच प्रकारे कंत्राटी पद्धतीने सेवा घेतली जाते.

उपनगरीय रुग्णालयात भूलतज्ज्ञांची कमतरता असल्याने केईम रुग्णालयातील 13 सहाय्यक प्राध्यापकांचीही मदत घेतली जाते. उपनगरातील 16 उपनगरीय रुग्णालयात डॉक्टरांंची जवळ जवळ निम्मी पदे रिक्त आहेत. वरिष्ठ डॉक्टर उपनगरातील रुग्णालयात जाऊन काम करण्यास तयार होत नाही अशी तक्रार नेहमीचीच आहे. त्याचबरोबर कोविड काळात वरिष्ठ पदावरुन निवृत्त होणाऱ्या डॉक्टरांच्या सेवेचा कालावधी महानगर पालिकेने वाढवला आहे.

प्रसुतीगृहातील डॉक्टरांच्या 42 जागा भरण्यासाठी महानगर पालिकेने अर्ज मागवले होते. त्याला फक्त 10 डॉक्टरांनी प्रतिसाद दिला. त्यातही चार उमेदवार पालिकेच्या रुग्णालयात वरिष्ठ पदावर पूर्वीपासूनच कार्यरत होते. पालिका रुग्णालयात नेहमीच डॉक्टरांची कमतरता असते.