Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : समुद्राच्या पिण्यायोग्य पाणी प्रकल्पाचे महिन्यात टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील समुद्राचे खारे पाणी पिण्या योग्य वापरासाठी करण्याच्या प्रकल्पासाठी पुढील महिन्यात टेंडर निघण्याची चिन्हे आहेत. २०० एमएलडी क्षमतेच्या या प्रकल्पासाठी सुमारे १६०० कोटींचा खर्च येणार होता. मात्र खर्चातील वाढीमुळे हा प्रकल्प खर्च सुमारे २,५०० कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. तसेच हा प्रकल्प चालवण्यासाठी सुमारे १,९०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आगामी ३ ते ४ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

मुंबईसाठी १०० किलोमीटरहून पाणी आणण्यापेक्षा समुद्राचे खारे पाणी गोडे म्हणजे पिण्यायोग्य करण्याचा प्रकल्प आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री पदी असताना सूचवला होता. मुंबईची पाण्याची गरज भागवायची असेल तर धरणे बांधावी लागतील. धरण बांधण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढतच जातो. त्याशिवाय धरणासाठी वृक्षतोडही अटळ आहे. त्याचा परिणाम हा पर्यावरणावरही होतो. म्हणूनच मुंबईसाठीच्या पाणी धोरणाच्या प्रकल्पाअंतर्गत या प्रकल्पाला सुरूवात झाली होती. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

मुंबई महापालिकेला विविध प्रकारच्या स्त्रोतांमधून ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. तर मुंबईची पाण्याची आवश्यकता ४४०० दशलक्ष लिटर इतकी आहे. पाण्याच्या या वाढत्या मागणीमुळेच मालाड येथील मनोरीत १२ हेक्टर भूखंडावर समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठीचा प्रकल्प आणण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पाअंतर्गत नेमलेल्या सल्लागार कंपनीचे सर्वेक्षणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

मुंबईला सध्या ४०० एमएलडी पाण्याची गरज आहे. पण २०० एमएलडीच्या या खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाने मुंबईची पाण्याची गरज भागणार नाही. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी १६०० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. खर्चात वाढ होऊन हा प्रकल्प अडीच हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. प्रकल्प चालवण्यासाठी १९०० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. हा प्रकल्प चालवण्यासाठी ३३ मेगा वॅट क्षमतेचा वीज प्रकल्पही उभारावा लागणार आहे.