Digital
Digital Tendernama
मुंबई

'BMC'चे यंदा 1300 डिजिटल क्लासरुम; 244 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) शाळांतील विद्यार्थ्यांना डिजिटल युगात सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांना डिजिटल शिक्षण देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी यंदा पालिकेच्या शाळांमध्ये १,३०० डिजिटल वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी यंदा २४४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या १,१५० शाळांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी शाळांना गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे महापालिकेने आता इंग्रजी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. 'मुंबई पब्लिक स्कूल' या नावाने आता शाळा सुरू आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण देता यावे यासाठी यंदा आणखी १३०० डिजिटल वर्ग सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. हे वर्ग सुरू झाल्यास महापालिकेच्या डिजिटल वर्गांची संख्या २६०० होणार आहे. या नव्या वर्गांमुळे डिजिटल शिक्षणाचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ होईल असा विश्वास महापालिकेच्या शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. 

नव्याने सुरू होणाऱ्या नवीन वर्गांबाबची तयारी पूर्ण झालेली आहे. या डिजिटल वर्गातील खास इलेक्ट्रॉनिक फळ्यावर पाठ्यपुस्तकानुसार आवश्यक तो मजकूर, ध्वनीचित्रफितीही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सध्या असलेल्या डिजिटल वर्गांची संख्या दुप्पटीपर्यंत होईल, अशी माहिती सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

गोवंडी परिसरातील शिवाजीनगर मनपा उर्दू शाळा क्रमांक ६ मध्ये सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा डिजिटल क्लासरुम सुरू केला होता. त्यानंतर डिजिटल वर्गांची संख्या वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी आतापर्यंत शैक्षणिक टॅब, डिजिटल क्लासरूम, व्हर्चुअल क्लासरूम सुरू करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.