BMC Tendernama
मुंबई

Mumbai : मालाडमध्ये 13 हजार पीएपी सदनिकांचा प्रकल्प ‘त्या’ बलाढ्य कंपनीकडे; 900 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सदनिका अर्थात पीएपी प्रकल्प बांधून घेण्यात येत आहेत. सध्या मालाडमध्ये १३ हजार पीएपीच्या बांधकामाचे कंत्राट डि बी रियल्टीला देण्यात आले आहे. जीएसटी वगळून सुमारे ५१ लाख रुपयांना एका सदनिकेची खरेदी केली जाणार आहे. यावर सुमारे ९०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबई महापालिकेने प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी सदनिका बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. चांदिवली, भांडुप, जुहू आणि मालाड भागांत पीएपीचे बांधकाम करण्यासाठी विकासकांची नेमणूक करण्यात आली आहे. चांदिवलीतील भूखंडावर ४ हजार सदनिका बांधण्यासाठी डिबी रियल्टीची नेमणूक करून डिसेंबर २०२१ मंजुरी देण्यात आली होती. परंत हा प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अखत्यारितील जागेवर राबवला जाणार असल्याने यासाठी आवश्यक तो करार विकासकाने न केल्याने ऑक्टोबर २०२३मध्ये डि बी रियल्टीचा मंजूर ठराव रद्द करण्यात आला. त्यामुळे चांदिवलीतील ४ हजार पीएपीचा प्रकल्प रद्द करण्यात आला होता.

आता मालाडमध्ये १३ हजार पीएपीच्या बांधकामाची जबाबदारी डि बी रियल्टीकडे सोपवण्यात आली आहे. मालाडमध्ये प्रति सदनिका ५० लाख ९९ हजार रुपयांचे अधिमूल्य निश्चित करुन १३ हजार पीएपी सदनिका डि बी रियल्टीकडून बांधून घेतल्या जाणार आहेत. यासाठी सुमारे ९०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या सदनिका ३५० चौरस फुटांच्या असतील. विकासकाने प्रती सदनिका या ४४ लाख रुपयांची बोली लावून जमीन आणि बांधकाम टिडीआर धरून या सदनिकांची किंमत ५८ लाख १७ हजार रुपयांना निश्चित केली होती. परंतु नोंदणी निरिक्षक तथा राज्याचे महा नियंत्रक यांनी सन २०२५-२६ करता वार्षिक सूची दरानुसार पीएपी सदनिकांचे मूल्यांकन केल्याप्रमाणे जीएसटी वगळून ५० लाख ९८ हजार रुपये प्रती सदनिका एवढ्या किंमतीनुसार जमीन व बांधकाम हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात टीडीआर व क्रेडीट नोटच्या स्वरुपात अधिमूल्याचे अधिदान विकासकाला देण्यात येणार आहे.