Property Tax
Property Tax Tendernama
मुंबई

BMC मालमत्ता कर : 10 बड्या उद्योजकांकडे 80 टक्के थकबाकी; आमदारांच्या सोसायटीचाही समावेश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीकामी मोठ्या मालमत्‍ताधारकांकडे पाठपुरावा सुरू केला असून त्‍याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये मंगळवारी १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्‍यात करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले. अद्यापही एकूण थकबाकी सुमारे ४०३ कोटींपेक्षा जास्त असून यात मोठ्या दहा उद्योजकांनी थकवलेला कर सुमारे ३४० कोटी इतका आहे.

मुंबई महापालिकेचा करनिर्धारण व संकलन विभाग गत वर्षभरापासून सातत्याने कर वसुलीकामी पाठपुरावा करत आहे. आर्थिक वर्ष २०२३ - २०२४ ची सुधारित कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर विविध प्रसार माध्यमांचा व समाज माध्‍यमांचा वापर करत नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मालमत्ता कर न भरलेल्यांची यादी जाहीर करून मालमत्‍ताधारकांना नोटीस देणे, थकबाकीदारांना टेलिकॉलिंग, एसएमएस करणे आदींवर भर दिला जात आहे.

करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीतकमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मालमत्ता कर कसा वसूल केला जाऊ शकतो, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागरिकांचे मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मंगळवारी, १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्‍यात आली आहे. आर्थिक वर्षातील उर्वरित दिवसांत अधिकाधिक कर वसूल करण्याचे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. क्षमता असूनही करभरणा न केलेल्या थकबाकीदारांची संपत्ती जप्त करण्याच्या पवित्र्यात पालिका आहे. शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या यादीत वरळीतील 'सुभदा' या आमदारांच्या गृहनिर्माण सोसायटीने १६ कोटी ८४ लाखांचा मालमत्ता कर न भरल्याचे उघड झाले आहे. करदात्‍या नागरिकांनी ३१ मार्च २०२४ पूर्वी कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

बडे थकबाकीदार -
एल अँड टी स्कॉमी इंजिनीअरिंग (एफ उत्तर विभाग)- ८८ कोटी ६३ लाख ७८ हजार ६७९ रुपये
रघुवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग) - ७१ कोटी २३ लाख ६५ हजार ८५२ रुपये
एचडीआयएल (एच पूर्व) - ५३ कोटी १२ लाख ३९ हजार ९५३ रुपये
पोपटलाल जमनालाल, सी ब्रिझ बिल्डिंग ६ ते १५ मजले (जी दक्षिण) - ४७ कोटी ९९ लाख ८४ हजार ७६६ रुपये
एचडीआयएल (के पूर्व) - ४४ कोटी ५ लाख ५४,०३५ रु.
रघुवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग) - १७ कोटी ८७ लाख ६१ हजार ५६५ रुपये
सुभदा गृहनिर्माण संस्था (जी दक्षिण) - १६ कोटी ८४ लाख ७५ हजार ७०० रुपये
नॉव्हेल्टी सिनेमा (डी विभाग) - १६ कोटी १ लाख ८० हजार ६३ रुपये
ओमकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) - १२ कोटी २१ लाख ३२ हजार १७३ रुपये
गोल्डन टोबॅको कंपनी प्रा. लि. (के दक्षिण विभाग) - ०८ कोटी ६७ लाख ८१ हजार ४८८ रुपये.