<div class="paragraphs"><p>Nair Hospital</p></div>

Nair Hospital

 

Tendernama

मुंबई

मुंबई महापालिकेची पत ढासळली; कंत्राटदाराची देणी थकली

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिक असलेल्या मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) संबंधित खात्यात पैशांची चणचण असल्याने एका कंत्राटदराचे (Contractor) २.२४ कोटीं रुपये थकीत ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे.

एवढेच नव्हे तर त्या कंत्राटदाराला त्याची थकबाकीची रक्कम देण्यासाठी महापालिकेने नायर रुग्णालयाच्या दुरुस्ती कामासाठी तरतूद निधीवर डल्ला मारुन त्यापैकी दीड कोटींचा निधी कंत्राटदाराला देण्यासाठी वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिका आरोग्य खात्याने सायन रुग्णालयाच्या अखत्यारीत असलेल्या धारावी ९० फिट रोड येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची ८ कोटी २४ लाख रुपये खर्चून मोठ्या दुरुस्तीची कामे २०१८ ते २०२१ या कालावधीत पूर्ण करुन घेतली. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला त्याची बिलाची रक्कम देणे भाग होते. त्यानुसार महापालिकेने कंत्राटदाराला ठरलेल्या ८ कोटी २४ लाख रुपये तात्काळ देणे अपेक्षित होते. मात्र महापालिकेने सायन रुग्णालयाशी निगडित दुरुस्ती कामांसाठी अर्थसंकल्पात फक्त ७५ लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यामुळे महापालिकेला या कंत्राटदाराची ८ कोटी २४ लाख रुपयांचे बिल देणे शक्य झाले नाही. महापालिकेने ६ कोटी रुपयांची व्यवस्था करुन त्या कंत्राटदाराला ही रक्कम दिली. मात्र तरीही उर्वरित २ कोटी २४ लाख रुपयांची रक्कम देणे बाकी राहिले. या रकमेची उभारणी करण्यासाठी एक शक्कल लढवली.

महापालिकेने नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानाची जुनी इमारत पाडून त्याजागेवर नवीन इमारत उभारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. या कामाची टेंडर प्रक्रिया सध्या सुरु असल्याने व कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने त्या १० कोटींच्या निधीवर प्रशासनाची नजर गेली. त्यानुसार, महापालिकेने या १० कोटीमधून १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी काढण्याचा निर्णय घेतला. हा दीड कोटींचा निधी काढून तो सायन रुग्णालयाशी निगडित आरोग्य केंद्राची दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराची थकीत रक्कम देण्याचा निर्णय घेतला.