मुंबई (Mumbai): मुलुंड पूर्वमधील दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावरून टाटा कॉलनीला जोडणारा ६० फूटाच्या जोडरस्त्याच्या कामाचे स्थानिक भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.
या जोडरस्त्याचे भूमीपूजन टाटा कॉलनीतील पूर्वरंग सोसायटी येथे पार पडले. गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता तयार व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्या कामाचे भूमीपूजन होत असून एका महिन्यात तो वाहतुकीस खुला होणार आहे, याचा अतिशय आनंद आहे, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी यावेळी सांगितले.
संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी म्हाडा जंक्शन, लक्ष्मीबाई शाळा जंक्शन आणि कॅम्पस हॉटेल जंक्शन येथे निर्माण होणाऱ्या प्रचंड कोंडीमुळे ३० ते ४० मिनिटांचा अतिरिक्त वेळ प्रवाशांना खर्ची पडतो. मात्र, या जोडरस्त्यामुळे म्हाडा जंक्शन, लक्ष्मीबाई शाळा जंक्शन आणि कॅम्पस हॉटेल जंक्शनवरील वाहतूक कोंडी तब्बल ६० टक्क्यांनी कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रस्त्याचे काम एक महिन्याच्या आत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही कोटेचा यांनी सांगितले.
विकास आराखड्यात येथे जोड रस्ता प्रस्तावित होता. सर्व आवश्यक मंजुरीसाठी मुंबई महानगर पालिका, नगरविकास विभाग आणि मिठागर आयुक्तांसह सर्व संस्थांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे कोटेचा यांनी सांगितले.