MMRDA Tendernama
मुंबई

MMRDA Tender: ठाकुर्लीतील 'त्या' अर्धवट पुलाचा वनवास संपणार

डोंबिवलीकरांच्या जिव्हाळ्याचा ठाकुर्ली रेल्वे फाटकाचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): गेल्या अनेक वर्षांपासून केवळ कागदावरच राहिलेला, डोंबिवलीकरांच्या जिव्हाळ्याचा ठाकुर्ली रेल्वे फाटकाचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे.

रोजच्या वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि धुळीचा सामना करणाऱ्या स्थानिक रहिवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौक या दरम्यान रखडलेल्या उन्नत मार्गाला आता गती मिळणार आहे.

स. वा. जोशी शाळा ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकापर्यंत पुलाचे काम पूर्ण होऊनही केवळ स्थानक ते म्हसोबा चौकापर्यंतचा दुवा न जुळल्याने हा पूल असून नसल्यासारखा झाला होता. जागा हस्तांतरण, बाधितांना मोबदला आणि पुनर्वसन यांसारख्या क्लिष्ट प्रक्रियेत हा प्रकल्प अडकला होता.

मात्र, आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या कामासाठी तब्बल ३६ कोटी रुपयांचे टेंडर जाहीर केल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. एकूण साठ कोटी त्रेपन्न लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील निधी प्रक्रिया मार्गी लागली आहे.

प्रस्तावित आराखड्यानुसार, या उन्नत मार्गाची लांबी ३६० मीटर तर रुंदी साडेसात मीटर असणार आहे. विशेष म्हणजे या पुलाला जोडणारे रस्ते एक हजार पन्नास मीटर लांबीचे असतील आणि हे रस्ते साडेसात ते साडेआठ मीटर रुंद केले जातील. पुलाचे बांधकाम जरी एमएमआरडीए करणार असली, तरी त्यासाठी लागणारी जागा मोकळी करून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनावर आहे.

आता पालिकेच्या पातळीवरही हालचालींना वेग आला असून, कामाच्या मार्गात येणाऱ्या घरांचे तोडकाम करून संबंधित बाधितांचे पुनर्वसन 'बीएसयूपी' योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे.

हा पूल संपूर्ण शहराच्या वाहतूक नियोजनाचा कणा ठरणार आहे. सध्या कल्याण आणि शिळफाटा रस्त्यावरून डोंबिवली पश्चिमेकडे येणाऱ्या वाहनांचा ओघ वाढल्याने चोळे गावात प्रचंड वाहतूक कोंडी होते. पुलाचे काम अर्धवट असल्याने वाहनांना नाईलाजास्तव चोळे गावातून स. वा. जोशी शाळेमार्गे पुलाकडे जावे लागते. मात्र, हा उन्नत मार्ग पूर्ण होताच म्हसोबा चौकातून वाहने थेट पुलावर जातील, ज्यामुळे गावातील अरुंद रस्त्यांवरील ताण कायमचा कमी होईल.

ठाकुर्ली, मानपाडा आणि डोंबिवली या तिन्ही भागांतील वाढत्या नागरीकरणामुळे होणारी कोंडी फुटण्यास यामुळे मदत होणार आहे. हा उन्नत मार्ग तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईलच, शिवाय अपघातांचा धोकाही कमी होईल, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.