Mumbai Metro
Mumbai Metro  Tendernama
मुंबई

Mumbai : 'मेट्रो-3'चा अटकेपार झेंडा; 'वर्ल्ड टनेल काँग्रेस 2024' मध्ये केस स्टडीज सादर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई 'मेट्रो-३'ने अटकेपार झेंडा फडकवला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) चीन येथे झालेल्या 'वर्ल्ड टनेल काँग्रेस २०२४' मध्ये सहभाग घेत मुंबई 'मेट्रो-३' चे चार केस स्टडीज सादर केले.

'वर्ल्ड टनेल काँग्रेस २०२४'मध्ये 'मेट्रो-३'च्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक कामांविषयी, ट्रॅक क्रॉसओव्हरसाठी मोठ्या बोगद्यांची बांधणी आणि पुनर्स्थापना करताना स्थानिक अधिवासावरील परिणाम कमी करण्यासाठी एमएमआरसीद्वारे केलेले प्रयत्न याबाबत प्रकल्प संचालक एस.के. गुप्ता यांनी सविस्तर सादरीकरण केले. यावेळी, गुंतागुंतीच्या परिस्थितीला कारणीभूत असणारे विविध घटक आणि मोठ्या केव्हर्न ट्रॅक क्रॉसओव्हरच्या यशस्वी पूर्ततेसाठी वापरलेले अनेक अभियांत्रिकी पर्याय मांडण्यात आले. आंतरराष्ट्रीय टनेलिंग बिरादरीने प्रयत्नांचे कौतुक केले. जागतिक स्तरावर या प्रकल्पाचे कौतुक केले जात आहे.

तसेच, 'मेट्रो-३'च्या बांधकामात वाहतूक आणि लॉजिस्टिक व्यवस्थापनासाठी स्टील डेकिंग आणि काँक्रिट डेकिंगच्या वापरातील साधक आणि बाधकांचा अभ्यास केला गेला आहे. मुंबई 'मेट्रो-३' च्या अनुभवावरील परिणाम 'वर्ल्ड टनेल काँग्रेस २०२४' मध्ये प्रकाशित करण्यात आला. पोस्टर सादरीकरणाद्वारे हा केस स्टडी सादर करण्यात आला. पर्यावरणीय, आर्थिक, बांधकाम सुलभता, अंमलबजावणीची कालमर्यादा, इत्यादी पैलूंवर गुण आणि तोटे विचारात घेण्यात आले, अशी माहिती एमएमआरसीएलने दिली.