मुंबई (Mumbai): शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ‘मेट्रो 2B’च्या 5.6 किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच बीकेसी परिसरात पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले असून, या दुहेरी उपक्रमामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे.
मुंबईच्या वाढत्या वाहतूक ताणाला पर्याय देण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा ‘मेट्रो 2B’ प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. 5.6 किमी लांबीच्या या टप्प्यात पाच स्थानके कार्यान्वित करण्यात आली असून, यामुळे पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या प्रवासाला गती मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण झाले. या प्रकल्पामुळे बीकेसी, अंधेरी, वांद्रे आणि चेंबूर दरम्यान अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असून, हार्बर लाईनला जोडणारी ही पहिली मेट्रो ठरणार आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे.
या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ₹10,986 कोटी असून, पहिल्या टप्प्यावर ₹3,225 कोटी खर्च झाला आहे. मंडाले येथे उभारण्यात येणारा दुहेरी मजल्याचा डेपो देशातील सर्वात मोठ्या डेपोमध्ये गणला जाणार आहे. तसेच सर्व स्थानकांना IGBC प्लॅटिनम रेटिंग देण्यात आले असून ऊर्जा बचतीवर विशेष भर देण्यात आला आहे.
याचवेळी बीकेसी परिसरात ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. ही स्वयंचलित प्रणाली लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी उपयुक्त ठरणार असून प्रवाशांना 100 ते 150 मीटर अंतरावर थेट पोहोचता येणार आहे. हा प्रकल्प BOT तत्त्वावर राबवण्यात येणार असून 20 महिन्यांत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
राज्य सरकारने मुंबई व मुंबई महानगर प्रदेशात 337 किमी मेट्रो नेटवर्क उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे 70 लाख प्रवासी मेट्रोचा वापर करतील, ज्यामुळे उपनगरी रेल्वेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईत मल्टी-मोडल, जलद आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.