मुंबई (Thane To Mira Bhayandar Metro-10 News): मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे आणि मिरा-भाईंदर शहरांना थेट जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गायमुख ते शिवाजी चौक, मिरा-भाईंदर या ९.७१८ किलोमीटर लांबीच्या मेट्रो १० मार्गिकेच्या बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) पायाभूत सुविधांना बळकट करणारा आणि लाखो प्रवाशांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे.
या महत्त्वाकांक्षी मेट्रो १० मार्गिकेसाठी अंदाजे आठ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका सध्या कार्यरत असलेल्या मेट्रो ४ (वडाळा-ठाणे-कासारवडवली) आणि मेट्रो ४ अ (कासारवडवली-गायमूख) मार्गिकेचा विस्तारित भाग असणार आहे.
ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यावर दररोज सुमारे ४ लाख ६६ हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करतील असा एमएमआरडीएचा अंदाज आहे. यामुळे या दोन शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि कार्यक्षम होईल.
एमएमआरडीएने या मार्गिकेचा सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी सिस्त्रा-डीही जेव्ही यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. सल्लागाराकडून प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच, कामासाठीचे टेंडर दस्तऐवज (टेंडर डॉक्युमेंट्स) देखील तयार झाले आहेत.
सद्यस्थितीत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे या मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. त्यांनी नुकतीच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा हे देखील उपस्थित होते.
या बैठकीत १५ डिसेंबरपर्यंत मेट्रो १० मार्गिकेसाठी टेंडर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्री सरनाईक यांनी या कालावधीत टेंडर प्रसिद्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
महापालिका निवडणुका जवळ आल्याने, शिवसेनेकडून (शिंदे गट) या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पासाठी टेंडर प्रसिद्ध करण्याची घाई सुरू असल्याची चर्चा आहे. निवडणुकांच्या आधी प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
सूत्रांनुसार, इतक्या कमी कालावधीत टेंडर काढणे प्रशासकीय दृष्ट्या शक्य होणार नाही, असे मत व्यक्त होत आहे. मात्र, राजकीय स्तरावरून या प्रकल्पाला गती देण्यासाठी जोर लावण्यात येत आहे. हा मेट्रो प्रकल्प यशस्वी झाल्यास ठाणे, मिरा-भाईंदर आणि संपूर्ण एमएमआरमधील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळेल.
या मार्गिकेवरील प्रस्तावित स्थानके :
गायमूख
रेती बंदर
चेना गाव
वर्सोवा गाव
काशिमिरा
मिरागाव