Mumbai Metro, Local Train Tendernama
मुंबई

Mumbai Local Train: 2027 मध्ये मेट्रोसारख्या 238 लोकल धावणार

चेंबूर मेट्रो स्थानक आणि भारत नगर-वाकोला उन्नत मार्गाचे लोकार्पण; ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी ‘अर्जुना’ टीबीएम कार्यान्वित

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन २०२७ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मार्च २०३० पर्यंत संपूर्ण लोकल ट्रेन मेट्रोसारख्या करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

एमएमआरडीएच्या दोन पायाभूत सुविधांचे ई-लोकार्पण, ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गातील ठाणे बाजूच्या ‘अर्जुना’ टीबीएमचा शुभारंभ आणि बीकेसीच्या जी-ब्लॉकला पूर्व द्रुतगती महामार्गाशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या नामकरण कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण

मेट्रो मार्गिका २बच्या टप्पा १अमधील चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. या स्थानकाला चेंबूर उपनगरीय रेल्वे आणि मोनोरेल स्थानकाची जोडणी मिळणार आहे. स्थानकाचा १८५ मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आठ डब्यांच्या मेट्रोसाठी अनुकूल आहे. लिफ्ट, सरकते जिने, सीसीटीव्ही, दिव्यांगांसाठी सुविधा आणि प्रथमोपचार कक्षाचा त्यात समावेश आहे.

मुंबई महानगरात मेट्रो मार्गिकांचे काम वेगाने सुरू असून यावर्षी ६० ते ७० किलोमीटरचे मार्ग सेवेत येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भारत नगर-वाकोला उन्नत मार्ग खुला

सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता टप्पा दोनमधील भारत नगर रोड ते वाकोला जंक्शनदरम्यानच्या १.४० किलोमीटर उन्नत मार्गाचेही लोकार्पण झाले. त्यामुळे बीकेसी आणि पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यान थेट जोडणी उपलब्ध होणार आहे. या मार्गामुळे कलिना, वाकोला आणि कलानगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ सुमारे ३५ मिनिटांनी वाचणार असल्याचे सांगण्यात आले.

‘अर्जुना’ टीबीएमचा शुभारंभ

ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या दुसऱ्या बोगद्यासाठी ‘अर्जुना’ टीबीएम कार्यान्वित करण्यात आले. पहिल्या बोगद्यासाठी ‘नायक’ टीबीएम यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आले आहे. दुहेरी बोगद्यामुळे ठाणे-बोरिवलीदरम्यानचे २३ किलोमीटरचे अंतर ११ किलोमीटरवर येऊन प्रवास १२ ते १५ मिनिटांत पूर्ण होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बीकेसीच्या जी-ब्लॉकला पूर्व द्रुतगती महामार्गाशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाला माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले यांचे नाव देण्यात आले.

Key Points

  • २०२७ मध्ये मेट्रोसारख्या २३८ उपनगरीय लोकल ट्रेन सेवेत आणण्याचे नियोजन.

  • मार्च २०३० पर्यंत संपूर्ण लोकल ट्रेन आधुनिक करण्याचे उद्दिष्ट.

  • चेंबूर मेट्रो स्थानकाचे लोकार्पण.

  • स्थानकाला उपनगरीय रेल्वे आणि मोनोरेलची जोडणी मिळणार.

  • भारत नगर रोड-वाकोला जंक्शन १.४० किमी उन्नत मार्ग खुला.

  • या मार्गामुळे प्रवासाचा वेळ सुमारे ३५ मिनिटांनी कमी होणार असल्याची माहिती.

  • ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यासाठी ‘अर्जुना’ टीबीएम कार्यान्वित.

  • ‘नायक’ आणि ‘अर्जुना’ टीबीएममुळे दोन्ही बोगद्यांचे काम समांतर सुरू राहणार.

  • ठाणे-बोरिवली प्रवास १२ ते १५ मिनिटांत पूर्ण होणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा.

  • बीकेसीतील उड्डाणपुलाला बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले यांचे नाव.