मुंबई (Mumbai): बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत प्रशासनाने तब्बल २३ महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. मुंबईतील १९०० किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, २०२७ पर्यंत शहरातील ९३ टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे (CC Roads) केले जातील, अशी घोषणा भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता येताच पहिल्या १०० दिवसांमध्ये तब्बल २३ मोठे निर्णय घेऊन मुंबईकरांना भ्रष्टाचार विरहीत कारभाराची झलक दाखवून दिली असून तब्बल २५ वर्षानंतर महानगरपालिकेत सुशासन अवतरले आहे, असा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केला. शहरातील १९०० किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून २०२७ पर्यंत मुंबईतले ९३ टक्के रस्ते सिमेंटचे होतील, अशी ग्वाही आमदार साटम यांनी दिली.
भाजपा, शिवसेना आणि रिपाइं महायुतीच्या मुंबई महापालिकेतील पहिल्या १०० दिवसांतील कामगिरीचा लेखाजोखा आमदार अमीत साटम यांनी पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी आमदार साटम यांनी २३ निर्णयाची यादी दिली. पत्रकार परिषदेला महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले व इतर समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते.
पालिकेतील स्टँडिंग कमिटी मधील अंडरस्टँडींग बंद केले. २७ शालेय वस्तुंची खरेदी जीईएम पोर्टलव्दोर होत असून औषधे व वैद्यकीय उपकरणांची खरेदी या पोर्टलव्दारे करण्यात येणार आहे. महापालिका रुणालयांमधील उपलब्ध खाटा आता ऑनलाईन समजतील. भायखळा प्राणिसंग्रहालयाची बिल्डरधार्जिणी ४९० कोटींच्या टेंडर, ३८५ कोटींचे रेलींग टेंडर, तसेच रस्ते चिन्हांकीतचे १५० कोटींचे टेंडर रद्द करून मुंबईकरांच्या हजार कोटी रुपयांची बचत कल्याचा दावा साटम यांनी केला.
गारगाई पिंजाळ योजनेत २७० कोटींची बचत केली. मुंबई क्लीन लिग अभियानाला गती दिली. राडारोडा उचलण्याचे धोरण आणले असून आवश्यक प्रकल्पांसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीसाठी (सीएसआर) पोर्टल विकसीत केले जात आहे. जन्म मृत्यू प्रकरणी ८७ हजार बनावट प्रमाणपत्रांचा घोटाळा उघड केला. १९०० किमी रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून २०२७ पर्यंत मुंबईतले ९३ टक्के रस्ते सिमेंटचे होतील, अशी ग्वाही साटम यांनी दिली.
अधिकृत फेरीवाल्यांसाठी कोड प्रणाली लागू करण्यात येत आहे. पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी आयआयटी तज्ज्ञांच्या मतदीने आराखडा बनवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान मूल्यावर आधारीत अभ्यासक्रमासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. मैदानाखाली २७ भूमिगत वाहनतळांचा प्रस्ताव असून १४ वर्षांच्या आतील मुलींना गभार्शय मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंधासाठी मोफत एचपीव्हीची लस देण्यात येणार असल्याचे सामट यांनी सांगितले.
मराठी भाषेच्या प्रसारासाठी तसेच पालिका शाळांमध्ये एआय आणि रोबोटीक लॅब्जसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. झोपडपट्टीच्या दत्तक वस्ती योजनेत आमूलाग्र बदल प्रस्तावित असून भायखळा प्राणिसंग्रहालयासाठी गुजरातकडून दोन आशियाई सिंहाची मागणी करण्यात आली आहे. तसेच पुढच्या काळातही महायुतीचा मुंबई महापलिकेतील कारभार भ्रष्टाचार विरहीत पारदर्शक राहील असा निर्धार साटम यांनी व्यक्त केला.