मुंबई (Mumbai) : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी - MPSC) सरकारी सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्याचा शासननिर्णय नुकताच जारी करण्यात आला.
या निर्णयामुळे ‘गट-ब’ संयुक्त सेवा परीक्षा तसेच ‘गट-क’ संयुक्त परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. ही शिथिलता केवळ एक वर्ष विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.
राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत एक वर्षाने वाढ करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात राज्य सरकारने घेतला होता. त्याचा शासन निर्णय काल जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. या निर्णयामुळे वयोमर्यादा ओलांडल्याने नोकरीपासून वंचित राहण्याची चिंता लागलेल्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ज्या उमेदवारांना आयोगाच्या विविध पदासाठी अर्ज करताना वयामुळे नऊ ते दहा महिने विलंब झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी प्रवेशासाठीची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने ते परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र ठरत आहेत. याअनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथीलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.