Nitin Gadkari Eknath Shinde Tendernama
मुंबई

देशाच्या विकासाचा मार्ग महाराष्ट्रातून जातो, असं का म्हणाले गडकरी?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून, महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. मुंबईत आयोजित संकल्प ते सिध्दी (नवा भारत, नवे संकल्प) परिषदेत ते बोलत होते. (Nitin Gadkari - Eknath Shinde News)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई पुणे एक्सप्रेस-वे असेल किंवा या महामंडळामार्फत महाराष्ट्रात बांधण्यात आलेले वेगवेगळे उड्डाणपूल असोत यामुळे महाराष्ट्राला एक वेगळी गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्त्वपूर्ण ठरणार असून, येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रोड कनेटिव्हिटीचे जाळे निर्माण होणार आहे, असे गडकरी म्हणाले.

राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर यावर आपण लक्ष देणे गरजचे आहे. साखर उद्योगाचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. इथेनॉलला येणाऱ्या काळात पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जाउत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर वरळी सी लिंकला नरीमन पॉईंट आणि विरारशी जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सध्या केंद्र शासनामार्फत सुरू असून, हे काम महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहे. दिल्ली- मुंबई महामार्ग बांधत असताना यातील 70 टक्के काम याच वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट ते दिल्ली असा प्रवास अवघ्या 12 तासांत पूर्ण करता येईल, असे रस्ते बांधणे हे माझे स्वप्न आहे. हा महामार्ग जेएनपीटीपर्यंत जाणार असून, त्याचे बहुतांश सर्व काम सुरू करण्यात आले आहे. दिल्ली आणि मुंबई शहरांना बंगळूरशी जोडणारे आणि पुणे ते औरंगाबाद हे महामार्ग करण्याचे नियोजन सुरू असून, राज्य शासनाने या महामार्गावरील जमिन अधिग्रहणाचे काम तत्काळ सुरू करावे असेही गडकरी म्हणाले.

या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.