Bullet Train Tendernama
मुंबई

Bullet Train : बुलेट ट्रेनची महाराष्ट्रातील कामे मिशन मोडवर.; ‘त्या’ एकमेव भूमिगत स्टेशनचे 60 टक्के खोदकाम पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची महाराष्ट्रातील स्थानके, रेल्वे मार्ग, पूल, बोगदे यांची कामे मिशन मोडवर सुरू आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) या कॉरिडॉरच्या एकमेव भूमिगत स्टेशनचे खोदकाम ६० टक्के पूर्ण झाले आहे. या स्टेशनच्या ६९ पैकी ३ बेस स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशनचा प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे 24 मीटर खोलीवर बांधण्याचे नियोजन आहे. या स्टेशनवर प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे तीन मजले असतील.

मुंबईकरांसह संपूर्ण देशातील नागरिकांना बुलेट ट्रेनची प्रतीक्षा लागली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आकार घेत असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचे राज्यातील काम गुजरातपेक्षा उशिराने सुरू झाले असले तरी या कामाने वेग घेतला असल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण १२ स्टेशन असून, बीकेसी हे एकमेव भूमिगत स्टेशन असणार आहे. या प्रकल्पामध्ये २१ किलोमीटर लांबीचा मार्ग भुयारी असणार आहे. त्याची सुरुवातही बीकेसी स्टेशनपासून होणार आहे. भुयारी मार्गात खाडीखालून सात किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे. यासोबतच पालघर जिल्ह्यातील डोंगरांमधून सात बोगदे जाणार असून, त्यांचे खोदकामही सुरू झाले आहे.

ठाणे रोलिंग स्टॉकचे काम आधीच देण्यात आले आहे. तसेच तेथील जमिनीवरील काम सुरू झाले आहे. ट्रॅकच्या बांधकामाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले असून, फेब्रुवारी २०२५ मध्ये टेक्निकल टेंडर उघडण्याचे नियोजन आहे. प्रकल्पामध्ये उन्नत मार्गासाठी लागणाऱ्या गर्डर स्पॅनसाठी पालघरमध्ये कास्टिंग यार्ड सुरू केला असून, ४० मीटरच्या फूल स्पॅन गर्डरद्वारे १०० किमी उन्नत मार्ग बांधला जाईल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा देशातील पहिला आणि सर्वात मोठा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे. 508 कि.मी. लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरीडॉर आहे. ताशी 320 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर एकूण 12 स्थानके असणार आहेत. यामधील आठ स्थानकांची गुजरातमध्ये, तर चार स्थानकांची महाराष्ट्रात उभारणी केली जाणार आहे. यामध्ये वांद्रे - कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. जून २०२६ मध्ये सुरत-बिलिमोरादरम्यान ट्रायल रन घेण्याचे प्रयोजन आहे. भारतात पहिल्यांदाच ३२० च्या वेगाने ही ट्रेन चालणार असल्याने प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने प्राथमिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात राज्यातील बुलेट ट्रेन -

- १५६ किमी. बुलेट ट्रेन प्रकल्पाची राज्यातील एकूण लांबी

- १३५ किमी. उन्नत मार्ग

- २१ किमी. भुयारी मार्ग (त्यात ७ किमी खाडीखालून जाणार आहे.)