Adani Tendernama
मुंबई

मुंबईतील आणखी 2 महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): वरळीतील आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशन म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास टेंडरमध्ये अदानी समूहाने बाजी मारली आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल नगर पुनर्विकासाची निविदा हनुरा रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडने खिशात टाकली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नुकत्याच या आर्थिक टेंडर खुल्या करण्यात आल्या आहेत. या पुनर्विकासांतून म्हाडाला ५ हजार कोटींहून अधिकचा महसूल मिळणार आहे.

सी अँड डी प्रारुपानुसार पुनर्विकास मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या धर्तीवर कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारूपानुसार तीन म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार वरळीतील आदर्श नगर, वांद्रे पश्चिम येथील वांद्रे रेक्लमेशन आणि अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल नगरचा रखडलेला पुनर्विकास सी अँड डी प्रारूपानुसार करण्यासाठी मुंबई मंडळाने निविदा मागविल्या होत्या.

या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला. आर्थिक निविदेनुसार आदर्श नगर पुनर्विकासासाठी अदानी प्रॉपर्टीज, लोढा समूह आणि जेएसडब्ल्यू समूहाने निविदा सादर केल्या होत्या. वांद्रे रेक्लमेशनसाठी अदानी प्रॉपर्टीज, लोढा समूह आणि जेएसडब्ल्यू याच कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्याचवेळी सरदार वल्लभभाई पटेल नगरसाठी अदानी प्रॉपर्टीज, रिलायन्स कंपनी आणि हनुरा रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. या निविदांची छाननी करून नुकत्याच मुंबई मंडळाने आर्थिक निविदा खुल्या केल्या आहेत. त्यानुसार दोन प्रकल्प आता अदानी प्रॉपर्टीजकडे गेले आहेत.

आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशन प्रकल्पाच्या निविदेत अदानी प्रॉपर्टीजने बाजी मारली आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल नगर पुनर्विकासाच्या निविदेत हनुरा रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडने बाजी मारल्याची माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली. आता या निविदांना मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. प्रस्तावास राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर दोन प्रकल्पांचे कंत्राट अदानी प्रॉपर्टीजला तर एका प्रकल्पाचे कंत्राट हनुरा कंपनीला देण्यात येईल आणि या कंपन्यांच्या माध्यमातून संबंधित प्रकल्प मार्गी लावले जातील.

आशियातील सर्वात मोठ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पानंतर अदानी समूहाने गोरेगावमधील मोतीलाल नगर पुनर्विकासाचेही कंत्राट मिळवले आहे. तर मोतीलाल नगरच्या आधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वांद्रे रेक्लमेशन येथील मुख्यालयासह आसपासच्या परिसराच्या पुनर्विकासाचे कंत्राटही याच कंपनीने पटकावले आहे. आता यात आदर्श नगर आणि वांद्रे रेक्लमेशन म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचीही भर पडणार आहे.

आदर्श नगर पुनर्विकासाअंतर्गत ८६३ सदनिकाधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या सदनिकाधारकांना ८०० ते २५०० चौरस फुटांची घरे उपलब्ध होणार आहेत. वांद्रे रेक्लमेशनमधील ४ हजारांहून अधिक सदनिकाधारकांचे पुनर्वसन केले जाणार असून या सदनिकाधारकांना ९२४ ते २३५० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत.

तर सरदार वल्लभभाई पटेल नगरमधील ४६७१ सदनिकाधारकांचे पुनर्वसन केले जाणार असून त्यांना ६८६ ते २२८० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. या तिन्ही पुनर्विकासांतून मुंबई मंडळाला मोठ्या संख्येने अतिरिक्त घरे उपलब्ध होतील. ही घरे सोडतीद्वारे सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली जातील. तर या पुनर्विकासांतून मंडळाला ५ हजार कोटींहून अधिक महसूलही मिळणार आहे.