MMRDA Tendernama
मुंबई

बदलापूर ते नवी मुंबई व मुंबई सुसाट; 'त्या ॲक्सेस कंट्रोल मार्गा'साठी MMRDAचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : बदलापूरहून थेट मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएने टेंडर प्रसिद्ध केले आहे. एमएमआरडीएने प्रकल्प सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली असून सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आहे. हा मार्ग झाल्यास बदलापूर ते नवी मुंबई आणि मुंबई हा प्रवास वेगवान होईल.

मुंबई-नवी मुंबई ते थेट कल्याण बदलापूर ॲक्सेस कंट्रोल महामार्ग उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्वप्रथम मागणी केली होती. एमएमआरडीएच्या वतीने या मार्गावर काम सुरू होते. महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनीही या मार्गासाठी पुढाकार घेतला होता. बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली या शहरांना थेट मुंबई तसेच नवी मुंबई या शहरांशी कशा पद्धतीने जोडता येईल याची चाचपणी सुरू होती. सध्या बदलापूरहून अंबरनाथ आणि डोंबिवलीमार्गे काटई राज्यमार्गाने शिळफाटा, महापे मार्गे नवी मुंबई गाठावी लागते. तर खोणी तळोजा मार्गेही नवी मुंबईला जाता येते. मुंबईला जाण्यासाठी अडीच ते तीन तासांचा तर नवी मुंबईला जाण्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ जातो. या वेळेसोबतच शहरांतर्गत प्रवास करावा लागतो. त्याचा शहरांतर्गत वाहतुकीवरही परिणाम होतो. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरमधील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडणारा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. प्रस्तावित 'नवी मुंबई एनएच - ३ व्हाया कल्याण बदलापूर ॲक्सेस कंट्रोल मार्गा'मुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी फक्त १०-१५ मिनिटे लागतील अशाप्रकारे याचे नियोजन केले जात आहे. शहरांतर्गत वाहतुकीला सक्षम पर्याय म्हणून पूर्व भाग ॲक्सेस कंट्रोल मार्गाने तर पश्चिम भाग मल्टीमॉडल कॉरिडॉरने जोडला जाणार आहे.

असा आहे मार्ग -
बदलापूर येथून जात असलेल्या मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या येथून या रस्त्याची सुरुवात होणार आहे. या मार्गावरून पुढे जात पालेगाव येथे मार्गाला पहिला इंटरचेंज असणार आहे. याद्वारे नागरिकांना अंबरनाथ शहरात तसेच काटई बदलापूर मार्गावर जाता येणार आहे. यापुढे हा मार्ग कल्याण पूर्वेतून जात असून मार्गावर हेदुटणे येथे दुसरा इंटरचेंज देण्यात आला आहे. या मार्गावरील हा अत्यंत महत्वाचा हा इंटरचेंज असून येथून वाहनचालकांना मेट्रो - १२ च्या हेदुटणे स्थानकात जाता येणार आहे. तसेच येथून कल्याण रिंग रोडची कनेक्टिव्हीटी या मार्गावरून असणार आहे. कल्याण - शिळफाटा मार्गावर देखील येथून जाता येणार आहे. यापुढे शिरढोण येथे या रस्त्यावरून मल्टी मॉडेल कॉरिडोअर मार्गाला जाता येणार आहे. या मल्टिमॉडेल कॉरिडोर रस्ता उभारणीचे काम देखील जलदगतीने सुरु आहे. या मल्टिमॉडेल कॉरिडोर रस्त्यामुळे थेट पुढे मुंबई पुणे एक्सप्रेसवे येथे जाणार आहे. तर हाच मल्टिमॉडेल कॉरिडोर सीटीएस कोस्टल रोडलाही जोडला जाणार असून याद्वारे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठणे सोपे होणार आहे. शिरढोण येथे तिसरा इंटरचेंज असल्याने कल्याण येथील २७ गावे याठिकाणी जोडली जाणार आहेत. तर उसाटणे येथून जाणाऱ्या राज्य महामार्गाला याची कनेक्टिव्हीटी असणार आहे. उसाटणे येथील रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. मुंबई - पनवेल हायवेला देखील या मार्गाची जोडणी करण्यात येणार असून नागरिकांना पनवेल येथे जाणे सोपे होणार आहे. तर पुढे हा मार्ग खारघर तुर्भे लिंक रोडला थेट जोडण्यात येणार आहे. या लिंक रोडची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष उभारणीचे काम देखील सुरु झाले आहे. या लिंक रोड द्वारे थेट नवी मुंबई शहरात जाता येणार आहे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे जाता येणार आहे.

प्रकल्पाचे फायदे -
हा संपूर्ण मार्ग ॲक्सेस कंट्रोल असून ग्रीन फिल्ड मार्ग असणार आहे. बदलापूर येथून मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असून याद्वारे नागरिकांना समृद्धी महामार्गाला जाता येणार आहे. तर समृद्धी महामार्गाद्वारे पुढे मुंबई - आग्रा हायवे येथे थेट जाता येणार आहे. यामुळे नाशिकच्या दिशेने प्रवास करता येणार आहे. या मार्गामुळे शहरांतर्गत होणारी वाहतूक थांबणार असून शहराच्या बाहेरून वाहने प्रवास करणार. यामुळे शहरातील वाहतूक जलदगतीने होईल आणि इतर शहरांमध्ये जाण्यासाठी एक जलद पर्याय उपलब्ध होईल. या मार्गाच्या उभारणीनंतर बदलापूर ते डोंबिवली येथील वाहनचालकांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय थेट मुंबई आणि नवी मुंबई गाठता येणार आहे. तसेच इतर जिल्ह्यात जाणाऱ्या महामार्गांवर देखील सहजतेने जाणार आहे.