Bullet Train
Bullet Train Tendernama
मुंबई

बुलेट ट्रेनचे पाऊल पुढे;चालकांच्या प्रशिक्षणासाठी 'मित्सुबिशी'सोबत

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राज्यात सत्तांतर होताच देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला (Mumbai-Ahmedabad Bullet Train) गती मिळाली आहे. आता तर नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. बुलेट ट्रेनच्या चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी १२ सिम्युलेटर मशीन घेण्याचा निर्णय एनएचएसआरसीएलने घेतला आहे. यासंदर्भात जपानच्या मैसर्स मित्सुबिशी प्रेसिजन कंपनीबरोबर २०१ कोटींचा करार झाला आहे. येत्या अडीच वर्षात या अत्याधुनिक बुलेट ट्रेनचे प्रशिक्षण देणाऱ्या १२ सिम्युलेटर मशीन भारतात दाखल होणार आहेत.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत देशातील पहिल्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सध्या गुजरात राज्यात प्रगतीपथावर असून २०२७ पर्यत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे. आता तर नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या वतीने बुलेट ट्रेन चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुरुवात करण्यात येत आहे. नुकतेच नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर (एमएएचएसआर) मध्ये प्रशिक्षण उद्देशासाठी वापरल्या जाणार्‍या एचएसआर ट्रेनच्या ( बुलेट ट्रेन म्हणून ओळखले जाते) प्रशिक्षण सिम्युलेटरचे डिझाइन, उत्पादन, पुरवठ्यासाठी जपानमधील मैसर्स मित्सुबिशी प्रेसिजन कंपनीबरोबर करार केला आहे. बुलेट ट्रेनच्या चालक, गार्ड, ट्रेनर आणि ट्रेन/रोलिंग स्टॉक मेंटेनन्स कर्मचार्‍यांना या सिम्युलेटर मशीन मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जपानच्या मैसर्स मित्सुबिशी प्रेसिजन कंपनीकडून सिम्युलेटर मशीन खरेदीसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने २०१ कोटी २१ लाख रुपये मोजले आहेत. त्यामध्ये बुलेट ट्रेनच्या चालक, गार्ड आणि ट्रेन/रोलिंग स्टॉक मेंटेनन्स कर्मचार्‍यांच्या प्रदिक्षणासाठी एकूण १२ सिम्युलेटर मशीन असणार आहेत. सिम्युलेटरच्या आपूर्तिसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने जपानच्या कंपनीला २८ महिन्याचा कालावधी दिला आहे.

या अत्याधुनिक सिम्युलेटर मशीनमुळे बुलेट ट्रेनचे ड्रायव्हिंग तत्त्व समजण्यास चालकांना आणि कर्मचाऱ्यांना मदत होईल. सिंगल ड्रायव्हर, सिंगल कंडक्टर तसेच ड्रायव्हर, कंडक्टर आणि डिस्पॅचर यांचे ग्रुप ट्रेनिंग एकाच वेळी घेणे सुद्धा शक्य होणार आहे.
- सुषमा गौडा, अपर महाव्यवस्थापक, जनसंपर्क, एनएचएसआरसीएल

- चालक पथकाच्या प्रशिक्षणासाठी सिम्युलेटर -१
- चालक आणि कंडक्टर प्रशिक्षणासाठी सिम्युलेटर- १०
- प्रशिक्षण देणाऱ्यासाठी सिम्युलेटर - १

सिम्युलेटर म्हणजे काय?
सिम्युलेटर हे एक यंत्र असून त्यात व्हीडियो गेमप्रमाणे वाहन किंवा ट्रेन चालवण्याचा अनुभव घेता येतो. एखाद्या रेल्वे गाडी प्रमाणेच स्टेअरिंग, स्पीडोमीटर, विविध बटन, हॉर्न, साईड इंडिकेटर अशी सर्व रचना केलेली असते. ट्रेनच्या काचेप्रमाणेच सिम्युलेटरमध्ये चालकासमोर काच असते. या काचेबाहेर रेल्वे मार्गावरील चित्र किंवा दृश्य निर्माण केली जातात. त्यामुळे सिम्युलेटरमध्ये बसलेल्या चालकाला जणूकाही खरोखरच बुलेट ट्रेन चालवतोय की काय? असा आभास निर्माण होतो. परिणामी, सिम्युलेटरमध्ये बसलेला चालक प्रत्यक्ष वाहन चालवत नसला, तरी त्यास तसा अनुभव घेता येतो.