मुंबई (Mumbai): मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतुकीची दर्जेदार सेवा पुरवण्याच्या उद्देशाने प्रस्तावित मेट्रो - १० आणि फाऊंटन ते घोडबंदर या रस्त्याची टेंडर (Tender) प्रक्रिया पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करावी, असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील विविध विकास कामांच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.
यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मेट्रो-१० च्या कामाबरोबरच फाऊंटन ते घोडबंदर या रस्त्याचा देखील विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे टेंडर एकाच वेळी काढून त्या कामाला गती द्यावी. जेणेकरून मेट्रोच्या सुविधेबरोबरच येथील वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य जनतेची सुटका होईल.
नव्याने होत असलेल्या मेट्रो-१० च्या स्थानकांना स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार प्रचलित स्थानिक गावाची व परिसराची नावे देण्यात यावीत. जेणेकरून तिथले मूळ रहिवासी असलेल्या आगरी-कोळी समाजाची संस्कृती जपली जाईल. त्या अनुषंगाने मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने याबाबतचा अहवाल मिरा-भाईंदर महापालिकेकडून मागून घ्यावा अशा सूचना सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महापालिका हद्दीमध्ये सुरू असलेल्या विविध ४७ रस्त्याच्या कामांना गती द्यावी व ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ४७ रस्त्यांच्या कामांपैकी ३५ रस्त्यांची काम पूर्ण झालेली आहेत. उर्वरित १२ रस्त्यांची ७० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी मंत्री सरनाईक यांनी एमएमआरडीएमार्फत करण्यात येत असलेल्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्र. ४, ५ व ६ या परिसरातील नियोजित रस्त्यांच्या विकासकामांचाही आढावा घेतला. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सेवा मार्ग हे ३१ डिसेंबर अखेर मुख्य रस्त्याला जोडण्यात यावेत. तसेच मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्याच्या मधोमध न उतरता ते रस्त्याच्या दोन्ही कडेला उतरण्यात यावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विन कुमार मुदगल व विक्रम कुमार तसेच मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा आदी उपस्थित होते.