Nitesh Rane Tendernama
मुंबई

Nitesh Rane : मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा मासळी बाजार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दुबई आणि सिडनीच्या धर्तीवर अंधेरी पूर्व येथील मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार आणि कोळी भवन उभारण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालय येथे बृहन्मुंबई महापालिका अंतर्गत मरोळ  येथे मच्छिमार बांधवासाठी कोळी भवन व आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार व मच्छिमार समस्यांची आढावा बैठक मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन., आयुक्त किशोर तावडे, फिशरी महामंडळाचे महाव्यवस्थापक अंकिता मेश्राम व  बेसिल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय मासळी बाजारामुळे मच्छीमारांना अधिक सुविधा मिळतील तसेच मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल. मरोळ परिसरातील कोळी बांधवांचा पारंपरिक व्यवसाय अधिक आधुनिक आणि जागतिक बाजारपेठेत स्पर्धेसाठी सक्षम होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मासळी बाजार आणि कोळी भवन तयार करतांना जागतिक दर्जाचे करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यात याव्यात, असेही मंत्री श्री. राणे यांनी नमूद केले. बेसील कंपनीच्या प्रतिनिधींना सादरीकरणाद्वारे प्रस्तावित मासळी बाजार व कोळी भवनाच्या इमारतीची माहिती दिली.