Madhuri Misal Tendernama
मुंबई

Mumbai : 'नैना' प्रकल्प क्षेत्रातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनि:सारण योजनांसाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र 'नैना' प्रकल्प क्षेत्रातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनि:सारण योजनांसाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली. नैना क्षेत्रातील ५०३८ घरांपैकी ३१५५ बांधकाम संरक्षित करण्यात आले आहेत. उर्वरित बांधकामावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

सदस्य विक्रांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. नगरविकास राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, या क्षेत्रातील भूखंड किंवा बांधकाम खरेदी-विक्री बंद करण्यात आली नसून फक्त बेकायदेशीर बांधकामे थांबविली आहेत. नगररचना परियोजनांमुळे नैना क्षेत्रातील विकासाला गती मिळणार असून, कोणत्याही बांधकामावर तातडीने कारवाई केली जाणार नाही. जमिन मालकांना अंतिम भूखंड देण्यात आले असून, त्यांच्या शंका दूर करण्यासाठी सिडको वेळोवेळी सभा घेत आहे. ४० टक्के विकसित भूखंड जमीनधारकांना मिळतो, तर ६० टक्के भूखंड सार्वजनिक सुविधा, रस्ते आणि अन्य प्रकल्पांसाठी राखीव असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, फक्त ८४९ घरांवरच रस्ता योजनांचा परिणाम होणार असून त्यावर वस्तुस्थिती तपासून निर्णय घेतला जाईल. रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनि:सारण योजनांसाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सदस्य सदाभाऊ खोत, सचिन अहिर यांनी चर्चेत सहभाग घेतला. नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) हे रायगड जिल्ह्यातील एक प्रस्तावित नियोजन क्षेत्र आहे. त्यासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाची (सिडको) नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण , पनवेल आणि उरण तालुक्यातील अंदाजे १७० गावांचा त्यात समावेश आहे.