मुंबई (Mumbai) : ठाणे जिल्ह्यातील बापगाव आणि नागपूर जिल्ह्यातील काळडोंगरी येथे पणन सुविधा प्रकल्प उभारण्यासाठी अहवाल तयार करण्यात आला असून या अहवालावर चर्चा करुन दोन्ही ठिकाणी पणन सुविधा प्रकल्प उभारण्यास पणन मंत्री जयकुमार रावल (Jaikumar Raval) यांनी मान्यता दिली.
बापगाव प्रकल्पास 157 कोटी रुपये तर काळ डोंगरी येथील प्रकल्पास 81 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. पणन मंत्री रावल म्हणाले, महाराष्ट्र हे फळे आणि भाजीपाला निर्यात क्षेत्रातील आघाडीचे राज्य असून बापगाव आणि काळडोंगरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारल्या जाव्यात. यासाठी यापूर्वी जेथे अशा सुविधा आहेत, त्यांचा अभ्यास करण्यात यावा. विविध फळांसाठी उपयुक्त आणि ऑटोमॅटिक काम करणारी अत्याधुनिक यंत्रणा प्रस्थापित करावी तसेच या सुविधा निर्माण झाल्यानंतर त्या कायम सुरळीत सुरू राहतील याची दक्षता घ्यावी.
बापगाव येथील जागेवर फळे भाजीपाला निर्यातीकरिता व्हेपर हिट ट्रिटमेंट प्लँट, विकिरण सुविधा, पॅक हाऊस उभारणे, शितगृह आणि पॅक हाऊस सुविधा असलेले आयात हब उभारणे, साठवणूक सुविधा, सार्वजनिक खाजगी भागीदारीकरिता सुविधा, व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारणे आदी या प्रकल्पातील मुख्य घटक आहेत. तर काळडोंगरी येथील जागेवर संत्रा फळाकरिता तसेच मिरचीकरिता पॅकहाऊस, प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेज, ग्रेडींग लाईन, धान्य व तेलबियाकरिता ग्रेडींग लाईन, ग्रेन शेड सुविधा, वाळलेल्या मिरचीकरिता मेकॅनिकल स्टेम कटींग मशीन, व्हॅक्युम पॅकींग सुविधा, सोलर टनेल डायर, कोल्ड स्टोअरेज, गोदाम उभारणीकरिता जागा, सार्वजनिक खाजगी भागीदारीकरिता जागा, व्यावसायिक कॉम्प्लेक्स आदी मुख्य घटक असणार आहेत. बापगाव प्रकल्पास 157 कोटी रुपये तर काळ डोंगरी येथील प्रकल्पास 81 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आमदार चरणसिंग ठाकूर, पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहसचिव विजय लहाने, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कदम, सल्लागार मझार्स ॲडव्हायजरी एलएलपी फर्मचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.