मुंबई (Mumbai) : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी व शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअतंर्गत होत असलेल्या कामांमधील अडचणी तातडीने मार्गी लावाव्यात. यासाठी संबधित यंत्रणांनी त्यांच्याशी निगडीत असलेली कामे, परवानग्या विनाविलंब देण्याची कार्यवाही करावी. या कामास प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिल्या.
मंत्रालयातील परिषद सभागृहात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी व शहापूर तालुक्यातील जनजीवन मिशनअंतर्गत योजनांमधील विविध अडचणी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. भिवंडी व शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेची कामे सुरू करण्यासाठी महसूल, जलसंपदा, वन विभाग, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभागाकडून आवश्यक परवानगी मिळण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जल जीवन मिशन योजनेची कामे जलद गतीने पूर्ण होऊन नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून संबधित विभाग व यंत्रणांनी त्यांच्या विभागाच्या अखत्यारीत असलेले विषय, आवश्यक परवानगी तातडीने द्यावी, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील यांनी दिल्या.
यावेळी बैठकीत शहापूर तालुक्यातील 97 गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना, कोनगाव, पडघा, आसनगाव, कळंभे, अंबाडी, कारीवली, बोरीवली तर्फ राहुर या पाणी पुरवठा योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार शांताराम मोरे, प्रधान सचिव संजीव खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहसचिव बी.जी पवार, मुख्य अभियंता प्रशांत भांबरे, अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते, कोण गावचे सरपंच रेखा सदाशिव पाटील आणि उपसरपंच रेखा निलेश मुकादम यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.