Aditi Tatkare Tendernama
मुंबई

शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याची चौकशी होणार; पुरवठादार जबाबदार असेल तर...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडी मध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्याच्या घटनेची चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बालकांच्या पोषण आहाराचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. याप्रकरणी पुरवठादारवर काय कारवाई करणार असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. वडखळ इथे ज्या पाकिटात मृत उंदीर सापडले त्याचे नमुने दोन प्रयोगशाळांना देऊनही त्यांनी तपासणी केली नाही, हे गंभीर आहे. या प्रयोगशाळा सरकारच्या असून जर ते ही नमुने तपासत नाहीत तर काय कारवाई करणार? तसेच अशी पाकीट जे पुरवठादार बनवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? पोषण आहारात जर असे अन्न असेल तर तो बालकांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाला जबाबदार धरणार, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केले.

दरम्यान, याप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. ही समिती झालेल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी हे नमुने तपासले नाही, या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असेही महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या.