मुंबई (Mumbai): पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी लागणाऱ्या अतिरिक्त जागा मागणीचा प्रस्ताव उद्योग विभागाने महसूल विभागाकडे सादर करावा, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
प्रस्तावित जंक्शन एमआयडीसीसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील जमिनीसंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मंजिरी मनोलकर, व्ही. सी. व्दारे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, पूर्वी झालेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसर येथे नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरिता मौजे जंक्शन, मौजे भरणेवाडी, मौजे अंथुर्णे, मौजे लासुर्णे येथील जमिनीसहित इतर अतिरिक्त लागणाऱ्या जमिनीबाबतचा सविस्तर प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग विभागामार्फत महसूल विभागाकडे सादर करावा. हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल असेही बावनकुळे यांनी सांगितले.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर परिसर येथे प्रस्तावित जंक्शन एमआयडीसी स्थापन करण्यात येणार आहे. सध्या असलेल्या जमिनीसहित एमआयडीसीसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता आहे. मौजे जंक्शन, मौजे भरणेवाडी, मौजे अंथुर्णे, मौजे लासुर्णे येथील जमिनीसहित या क्षेत्रालगत असलेल्या शेती महामंडळाचे सलग १००० एकर क्षेत्र नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात यावे.
या 'एमआयडीसी’मुळे अनेक उद्योग इंदापूर तालुक्यात येणार आहेत. तसेच तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इंदापूर तालुक्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही एमआयडीसी उपयुक्त ठरणार आहे, असेही भरणे म्हणाले.