Mantralay Tendernama
मुंबई

MHADA : म्हाडाच्या त्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार! काय आहे प्रकरण?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : प्रधानमंत्री आवास (PM Awas) योजनेंतर्गत खासगी विकासकांना भागिदारी प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच ॲडव्हान्समध्ये 50 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याप्रकरणी संपूर्ण चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत दिली.

सदस्य सचिन आहिर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी, भाई जगताप, अनिल परब यांनी सहभाग घेतला.

म्हाडाच्या दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे सांगून मंत्री देसाई म्हणाले की, याबाबतचा अहवाल नुकताच शासनास प्राप्त झाला आहे. कोणत्या प्रकल्पाला कोणत्या मुद्द्यासाठी निधी दिला याविषयी अपर मुख्य सचिव गृहनिर्माण यांच्यामार्फत छाननी केली जाईल.

अनियमितता झाली असल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात 20 लाख घरे बांधण्याचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. आवास योजनेसाठी राज्यात 6 हजार 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहितीही मंत्री देसाई यांनी दिली.