मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या समूह पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तब्बल ३४ एकर जागेवर हा परिसर वसला आहे. या प्रकल्पाचा आराखडा 'कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प - अर्बन व्हिलेज' या नावाने तयार करण्यात आला आहे.
कामाठीपुरा समूह पुनर्विकास हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक 1 ते 15 या भागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा व भूखंडांचा एकत्रितरित्या समूह पुनर्विकास हा विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034, विनियम 33 (9) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत केला जाणार आहे. दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्वाच्या 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक 1 ते 15 या गल्ल्यांमध्ये सुमारे 943 उपकरप्राप्त इमारती असून यामध्ये सुमारे 6625 निवासी व 1376 अनिवासी असे एकूण 8001 भाडेकरू / रहिवासी वास्तव्यास असून 800 जमीन मालक आहेत. या क्षेत्रातील इमारती 100 वर्षे जुन्या आहेत. तसेच संपूर्ण भागातील भूखंडाचे निव्वळ क्षेत्रफळ सुमारे 73,144.84 चौरस मीटर आहे. या क्षेत्रातील इमारतींचे भूखंड हे अत्यंत छोट्या आकाराचे व अरुंद असल्यामुळे समूह पुनर्विकास हा शाश्वत पर्याय ठरतो. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या 8001 भाडेकरू/रहिवाशांना यांना हक्काचे कायम स्वरूपी घर प्राप्त होणार आहे.
कामाठीपुरा क्षेत्रातील इमारतींचा एकत्रितरित्या समूह पुनर्विकास म्हाडातर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034, विनियम 33 (9) अंतर्गत करण्यास 12/01/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली. त्यानुसार प्रकल्पाच्या आराखड्यासाठी टेंडरद्वारे मेसर्स माहिमतुरा कन्सल्टंट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा आराखडा 'कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प - अर्बन व्हिलेज' या नावाने तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून रहिवाशांना मोठ्या व सुरक्षित सदनिका, नियोजनबद्ध पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये वाणिज्यिक इमारत, मनोरंजनाचे मैदान सारख्या सुविधांचा देखील समावेश असणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडास 44,000 चौ. मी. क्षेत्र ठेकेदारांमार्फत उपलब्ध होणार असल्याने मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हाडास मोठ्या प्रमाणात गृहासाठा उपलब्ध होणार आहे. तसेच विकासकास 56,7000 चौ. मी. क्षेत्र उपलब्ध होणार असून अंदाजे ४५०० सदनिका उपलब्धा होणार आहेत.
कामाठीपुरा क्षेत्रातील जमिन मालकांना शासन निर्णय दि.02,07,2024 अन्वये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 50चौ.मी क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता 500 चौ. फुट क्षेत्रफळाची 01 सदनिका, 51 चौ.मी. ते 100 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता 500 चौ. फुट क्षेत्रफळाची 02 सदनिका, 101 चौ.मी. ते 150 चौ. मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता 500 चौ. फुट क्षेत्रफळाची 03 सदनिका, 151 चौ.मी. ते 200 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता 500 चौ. फूट क्षेत्रफळाच्या 04 सदनिका, 200 चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाच्या पुढील प्रत्येक 50 चौ.मी. भूखंड क्षेत्रफळाकरिता 500 चौ. फुट क्षेत्रफळाची 1 अतिरिक्त सदनिका जमीन मालकांना दिली जाणार आहे.