Redevelopment Tendernama
मुंबई

MHADA : मुंबईतील 'त्या' 4 SRA प्रकल्पांसाठी म्हाडाचे लवकरच Tender

Mumbai : म्हाडाच्या भूखंडावरील झोपड्यांचा, जुन्या चाळींचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार होता; मात्र विविध कारणास्तव हा पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडला आहे.

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील वर्षानुवर्षे रखडलेल्या म्हाडाच्या (MHADA) भूखंडावरील चार झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या (SRA) कामाला आता वेग येणार आहे.

म्हाडाने कुर्ला येथील दोन, तर जोगेश्वरी येथील दोन प्रकल्प ताब्यात घेण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला हेतू पत्र (एलओआय) सादर केले आहेत. म्हाडा आर्किटेक्ट आणि विकसकाची नियुक्ती करण्यासाठी लवकरच टेंडर प्रसिद्ध करणार आहे. यात जोगेश्वरी मजास येथील त्रिचरण को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आणि साईबाबा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटींचा समावेश आहे. यामध्ये १४३ रहिवासी असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर म्हाडाला जवळपास २९० घरे मिळू शकणार आहेत.

तसेच कुर्ला येथील श्रमिकनगर एसआरएस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आणि चेंबूर येथील जागृती एसआरए को-कॉपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने 'एलओआय' दिला आहे. येथे २६१ रहिवासी असून पुनर्विकासाच्या माध्यमातून म्हाडाला २५५ घरे मिळणार आहेत.

म्हाडाच्या भूखंडावरील झोपड्यांचा, जुन्या चाळींचा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार होता; मात्र विविध कारणास्तव हा पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडला आहे. त्यामुळे तो मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने एसआरए आणि म्हाडामधील सह-भागीदारीला (जॉईंट व्हेंचर) मंजुरी दिली आहे. त्यातून म्हाडाने निवडलेल्या १७ प्रकल्पांपैकी चार प्रकल्पाच्या 'एलओआय'चा प्रस्ताव एसआरएला दिला आहे.

म्हाडाच्या भूखंडावर रखडलेल्या एसआरए प्रकल्पाच्या जागेवर अनेक ठिकाणी झोपड्या, चाळी आणि दोन-तीन मजली इमारती आहेत, तर काही ठिकाणच्या झोपड्या काढून विकसकांनी हा भूखंड ताब्यात घेतला आहे; मात्र एसआरए योजनेंतर्गत झोपड्या, चाळी रिकाम्या करण्याचे किंवा विकसकांकडे असलेला भूखंड काढून घेण्याचे अधिकार म्हाडाला नाहीत. त्याबाबतचे अधिकार एसआरएला आहेत. त्यामुळे हे भूखंड ताब्यात देण्याची किंवा रिकामी करण्याची जबाबदारी एसआरएची असेल, असे म्हाडाने स्पष्ट केले.