Virar Alibaug Corridor Tendernama
मुंबई

Mumbai : विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर बीओटीवर राबविणार; मंत्रिमंडळाची मोहोर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर बांधा-वापरा हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. या महामार्गाच्या कामासाठी भूसंपादनासह बांधकाम आणि अन्य, असा एकूण ६६ हजार कोटींचा खर्च येणार आहे.

राज्यातील आठ महामार्गांना जोडणाऱ्या विरार ते अलिबाग या १२६.०६ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पापैकी पालघर जिल्ह्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बलावली दरम्यानच्या ९६.४१० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने करण्यास तसेच भूसंपादनाकरिता २२,२५० कोटी रुपये आणि यावरील व्याजापोटी १४,७६३ कोटी अशा एकूण ३७,०१३ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील ९८.५ किमी लांबीच्या मार्गाच्या कामासाठी काढलेली १९ हजार ३३४ कोटींची टेंडर रद्द करण्यात आली आहेत. कंत्राटदारांनी ३६ टक्के अधिक दराने टेंडर भरल्याने प्रकल्पाचा बांधकाम खर्च २६ हजार ३०० कोटी रुपयांवर गेला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर (एमएसआरडीसी) टीकाही झाली होती.

खर्चाचा बोजा सरकारवर पडू नये, यासाठी हा प्रकल्प 'बीओटी'वर उभारला जावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार तसा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. एमएसआरडीसीने विरार ते अलिबाग दरम्यान १२८ किलोमीटर लांबीचा मार्ग उभारणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर मोलाचा ठरणार आहे. हा मार्ग वसई येथील राष्ट्रीय महामार्ग ८ वरील नवघर येथून सुरू होईल. तर पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावादरम्यान हा मार्ग असेल. या मल्टीमॉडेल कॉरीडोअरमध्ये आठ इंटरचेंज, २८ वाहन अंडरपास, १६ पादचारी अंडरपास आणि १२० कल्व्हर्ट असतील. संपूर्ण मार्ग आठ पदरी असून त्यासाठी २१ उड्डाणपूल, पाच टनेल, ४० मोठे आणि ३२ छोटे पूल प्रस्तावित आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास त्याचा मोठा लाभ होणार असून येथील प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे. या मार्गामधोमध १३६ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्याचेही प्रस्तावित आहे.

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर एमएमआरडीएकडून एमएसआरडीसीकडे सोपविल्याने महामंडळास तो समृद्धी महामार्गासह प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस वे सह जेएनपीटीला जोडता येणे सोपे झाले आहे. सध्या समृद्धी महामार्गाची जेएनपीटीला जोडणी नसल्याने एमएसआरडीसीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई-वडोदरा महामार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर हा समृद्धी आणि कोकण एक्स्प्रेस वे ला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याशिवाय मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, जेएनपीटी ते मुंबई-गोवा-पुणे यांना जोडणारा एनएच-४ बी या महामार्गांना जोडण्यात येणार आहे.