Jaykumar Gore Tendernama
मुंबई

जव्हार तालुक्यातील 'त्या' रस्त्याबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी काय केली घोषणा?

तिलोंडा मुख्य रस्ता ते आंबेपाडा जोडरस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लवकरच

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): जव्हार तालुक्यातील तिलोंडा अंतर्गत चांभारशेत–तिलोंडा मुख्य रस्ता (ग्रामीण मार्ग ९४) ते आंबेपाडा हा १८०० मीटरचा अवर्गीकृत ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता आहे. २०२४ - २५ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ४६ लाख निधीतून माती-मुरुम व खडीकरणाचे काम पूर्ण झाले असून, सध्या जीप व चारचाकी वाहनांनी वाहतूक शक्य आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिले.

तिलोंडा (आंबेपाडा) (ता. जव्हार, जि. पालघर) या गावासह परिसरातील सर्व वाड्या-वस्त्या मुख्य रस्त्यांना जोडण्याबाबत सदस्य हरिश्चंद्र भोये यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य नाना पटोले, सुनिल प्रभू यांनी सहभाग घेतला.

मंत्री गोरे यांनी सांगितले की, तिलोंडा (आंबेपाडा) या गावासह परिसरातील काही ठिकाणी रस्त्यांबाबत तक्रारी आल्याने अधिकाऱ्यांना तातडीने तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून संबंधित कामांची तपासणी केली जाईल. कामामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल.

मंत्री गोरे म्हणाले, उर्वरित रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदिवासी विभागाशी चर्चा झाल्याचे सांगून, साधारण तीन महिन्यांत रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचा देखभाल खर्च कमी करण्यासाठी राज्यात टप्प्याटप्प्याने काँक्रीट व ‘व्हाईट टॉपिंग’ रस्ते करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

तिलोंडा (आंबेपाडा) (ता. जव्हार, जि. पालघर) येथे रस्ता नसल्यामुळे उपचारास विलंब होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची बाब उपस्थित करण्यात आली. संबंधित तरुण दीर्घकाळ आजारी होता. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी वेदांता वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी फुफ्फुसाच्या न्युमोनियामुळे त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह चांभारशेत तिलोंडा येथील मुख्य रस्त्यापर्यंत सोडण्यात आला होता, अशी माहिती ग्रामविकासमंत्री गोरे यांनी दिली.