Vande Bharat Train
Vande Bharat Train Tendernama
मुंबई

'वंदे भारत'मध्ये आता विमानांप्रमाणे...; 'टाटा'ला 145 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : भारतीय रेल्वेची अत्याधुनिक ट्रेन 'वंदे भारत'मध्ये (Vande Bharat Trains) लवकरच विशेष प्रकारची अत्याधुनिक आसने असणार आहेत. देशात पहिल्यांदाच ट्रेनमध्ये अशा प्रकारची आसन व्यवस्था केली जाणार आहेत. या आसनांवर बसल्यानंतर प्रवाशांना विमानात बसल्याचा फील येईल, असा दावा केला जात आहे. याचे १४५ कोटींचे टेंडर बलाढ्य टाटा स्टील लिमिटेडला (Tata Steel Ltd.) मिळाले असून, कंपनी सप्टेंबरपासून या आसनांचा पुरवठा सुरू करणार आहे. (Indian Railways News)

वंदे भारत ट्रेन अत्याधुनिक सुविधांसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आता या गाड्यांमध्ये आणखी एका सुविधेची भर पडणार आहे. या ट्रेनमध्ये देशातील पहिली अत्याधुनिक सीट असणार आहे. टाटा स्टीलला वंदे भारत एक्स्प्रेसच्या २२ गाड्यांसाठी सीट्स पुरवठा करण्याचे टेंडर मिळाले आहे.

खास डिझाइन केलेल्या या सीट्स आहेत. त्या १८० अंशांपर्यंत फिरू शकतात. यामध्ये विमानातील सीटसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. या सीट्स फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमरच्या बनलेल्या आहेत. त्यांच्या देखभालीचा खर्चही खूप कमी असेल. प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठीही प्रभावी ठरणारा भारतातील ट्रेनमधील आसनांचा हा पहिलाच प्रकार आहे.

टाटा स्टीलकडून सप्टेंबरपासून या आसनांचा पुरवठा सुरू होईल. 20 ट्रेन्ससाठी मागणी करण्यात आलेल्या या आसनांचा पुरवठा येत्या 12 महिन्यांत म्हणजे एका वर्षात पूर्ण केला जाणार आहे. देशातील पहिली सर्वांत वेगवान धावणारी वंदे भारत ट्रेन पूर्णपणे देशांतर्गत विकसित करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेन ताशी 130 किमी वेगाने धावू शकते. यामुळेच देशातील सर्वांत वेगवान गाड्यांपैकी एक मानली जाते.

टाटा स्टील सँडविच पॅनल्स बनवण्यासाठी महाराष्ट्रातील खोपोलीमध्ये (जिल्हा रायगड) नवीन प्लांट उभारत आहे. यामध्ये नेदरलँडची एक कंपनी तांत्रिक भागीदार आहे. या प्लांटमध्ये तयार करण्यात आलेल्या सँडविच पॅनल्सचा वापर रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या अंतर्गत सजावटीसाठी केला जाणार आहे.