Mahatma Phule, Savitribai Phule Tendernama
मुंबई

'क्रांतीज्योतीं'च्या 'त्या' स्मारकासाठी सरकारने मंजूर केले 142 कोटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले Savitribai Phule) यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते. मौजे नायगाव येथील या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपये तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67 लाख 17 हजार रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे हे स्मारक त्यांच्या कार्याला अभिवादन ठरणार आहे. तसेच सोबतच उभे राहणारे महिला प्रशिक्षण केंद्र या परिसरातील महिलांसाठी सबलीकरणासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

महिला प्रशिक्षण केंद्राचे दीर्घकालीन व्यवस्थापन, प्रशासन, तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, यशदा, कौशल्य विकास विभाग तसेच ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार आहे.