मुंबई (Mumbai) : बदलापूर, शीळफाटा, महापे, घनसोली, निळजे आदी भागांना थेट मुंबईशी जोडणारी कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ च्या (Kanjurmarg To Badlapur Metro Line, Metro-14) कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए MMRDA) लवकरच टेंडर (Tender) प्रसिद्ध करणार आहे.
सार्वजनिक- खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी PPP) हा ३८ किलोमीटर लांबीची मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यावर सुमारे १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रोने सुमारे ७ लाख प्रवासी ये जा करतील असा अंदाज आहे.
मेट्रो १४ मार्गिका ३८ किमी लांबीची असून, तिच्यावर एकूण १५ स्थानके असतील. या मार्गिकेला कांजूरमार्ग येथून सुरुवात होणार असून, घनसोलीपर्यंत ती भूमिगत असेल. हा मार्ग ठाणे खाडी खालून जाणार आहे. ठाणे खाडी परिसरात या मेट्रो मार्गिकेची लांबी जवळपास ५.७ किमी असेल. तर, घनसोली ते बदलापूर हा मार्ग उन्नत असेल. या मार्गिकेचा ४.३८ किमी लांबीचा मार्ग पारसिक हिल भागातून जाणार आहे.
या प्रकल्पासाठी तब्बल १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मिलान मेट्रो या इटालियन कंपनीने तयार केला आहे. हा डीपीआर आयआयटी मुंबईकडून तपासून घेऊन एमएमआरडीएने अंतिम केला आहे.
सुरुवातीला या मेट्रो मार्गिकेचे काम पीपीपी तत्त्वावर उभारण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य टेंडर मागविले जाणार आहे. त्यानंतर यातील पात्र कंपन्यांकडून रिक्वेस्ट फॉर कोटेशन आणि विनंती प्रस्ताव मागविण्यात येतील, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
हा मेट्रो प्रकल्प ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातून जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एमएमआरडीएने सल्लागार नेमण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू केली आहे. सल्लागारच पर्यावरण मंजुरी घेण्याचेही काम करेल. त्यामुळे कंत्राटदार अंतिम करेपर्यंत पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.
या मेट्रो मार्गिकेचा डीपीआर तयार करणारी मिलान मेट्रो सल्लागार कंपनीही मेट्रो मार्गिका पीपीपी तत्त्वावर उभारण्यासाठी इच्छुक आहे. टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी या कंपनीने एमएमआरडीएला यापूर्वीच विनंती केली आहे.