Navi Mumbai International Airport
Navi Mumbai International Airport Tendernama
मुंबई

रायगडचा विकास आता सुस्साट...१० हजार कोटींची 'ही' कामे प्रगतीपथावर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रायगड जिल्ह्यातील (Raigad District) रस्ते विकासाला केंद्र आणि राज्य सरकारने (Central And State Government) मोठी गती दिली आहे. जिल्ह्यात दहा हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. याअंतर्गत १३ प्रमुख रस्त्यांचा विकास केला जात आहे. आणखी १,७९२ कोटींची चार कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, त्यामुळे आगामी काळात रायगड जिल्ह्यातील दळणवळण सुसह्य आणि गतिमान होणार आहे.

रायगड जिल्ह्यात पूर्वी १५४ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. यात ३४८ किलोमीटर लांबीच्या नवीन मार्गाचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे आता जिल्ह्यात ५०३ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत. यात पेण ते खोपोली, महाड ते रायगड किल्ला, वडखळ ते अलिबाग, दिघी ते माणगाव, इंदापूर ते माणगाव, पाली खोपोली आणि पुणे ताम्हाणी घाटमार्गे माणगाव रस्त्याचा समावेश आहे. नवी मुंबई प्रस्तावित विमानतळाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची कामेही जोमाने सुरू आहेत. जेएनपीटीला जोडणाऱ्या रस्त्यांचाही विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विस्तारत आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून साडेआठशे कोटींच्या रेवस - करंजा पूलाचे टेंडर मागविण्यात आले आहे. त्याचबरोबर रेवस ते रेड्डी सागरी मार्गासाठी नऊ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून हा रस्ता केला जाणार असून, रस्त्याच्या सुधारित आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते गोवा ग्रिनफिल्ड एक्सप्रेस महामार्ग उभारण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. अलिबाग विरार मल्टिमॉडेल कॉरिडोरसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हे कामही आगामी काळात मार्गी लागणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते कशेडी महामार्गाचे चौपदरीकरण हाती घेण्यात आले आहे. यातील पळस्पे ते इंदापूर या रखडलेल्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंदापूर ते कशेडी मार्गातील वीर ते भोगाव आणि भोगाव ते खवटी मार्गातील कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. इंदापूर ते वडपाले टप्प्यातील काम काही अडचणीमुळे रेंगाळले आहे.

राज्याचा औद्योगिक जिल्हा अशी रायगडची ओळख आहे. महाकाय औद्योगिक प्रकल्प जिल्ह्यात येऊ घातले आहेत. नवी मुंबईचे विमानतळही रायगड जिल्ह्यात विकसित होत आहे. पर्यटनाच्या कक्षाही रुंदावत आहेत. त्यामुळे रस्ते विकासाची ही सर्व कामे लवकर मार्गी लागली तर विकासाला चालना मिळणार आहे.