Nala safai Tendernama
मुंबई

Kalyan : नालेसफाईची कामे संथ गतीने काम करणाऱ्या ठेकेदारांना महापालिकेच्या नोटिसा

टेंडरनामा ब्युरो

कल्याण (Kalyan) : कल्याण-डोंबिवली महापालिकेची नालेसफाई सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या महापालिकेची पहिल्या टप्प्यातील नालेसफाई अवघी ४० टक्के पूर्ण झाली आहे. येत्या १७ दिवसांत महापालिकेला उर्वरित ६० टक्के नालेसफाई पूर्ण करावी लागणार आहे. तसेच डी आणि जे प्रभागांतील ठेकेदारांना संथ गतीने काम करत असल्याने नोटिसादेखील महापालिकेकडून काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कचरा वाहून जाण्यात मदत होत असल्याने काही ठेकेदारांचे फावल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी नालेसफाईचा हुरूप जरी दाखवला असला तरी ही नालेसफाई करणारे ठेकेदार मात्र महापालिकेच्या आणि आयुक्तांच्या नाकीनऊ आणत आहेत. महापालिका तीन टप्प्यात नालेसफाई करत असून, या एकूण कामाचा वस्तू व सेवा करासहीत खर्च हा चार कोटींच्या घरात गेला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील नालेसफाईची कामे संथ गतीने सुरू आहेत. आतापर्यंत केवळ ४० टक्केच नाले व गटार सफाई पूर्ण झाली आहे. याला महापालिकेच्या जलनिस्सारण व मलनिस्सारण विभागाकडून दुजोरादेखील मिळाला आहे. त्यामुळे आता उर्वरित ६० टक्के नालेसफाई येत्या १७ दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा ३१ मे ही अंतिम मुदत हुकण्याची शक्यता आहे.

नालेसफाईची कामे संथ गतीने सुरू असल्याने अशा ठेकेदारांवर कारवाईचा इशारा महापालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. यानंतरही न जुमानणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. यात महापालिकेच्या डी आणि जे प्रभागांत नालेसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काम संथ गतीने सुरू असल्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यानंतर घाबरून जाऊन या ठेकेदारांनी सफाई यंत्रे वाढवण्यास सुरुवात केली आहे.

नालेसफाई विहित मुदतीतच

महापालिकेचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ म्हणाले की, “सध्या ४० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नाले आणि गटारसफाई ही विहित मुदतीत नक्की पूर्ण होईल. तसेच कामाचा वेग कमी राखणाऱ्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.”

अवकाळी पाऊस पथ्यावर

सध्या सुरू असलेला अवकाळी पाऊस हा नालेसफाई आणि गटारसफाई करणाऱ्या ठेकेदारांच्या पथ्यावर पडला आहे, कारण या पावसामुळे नाले आणि विशेषतः गटारातील कचरा वाहून जात आहे. त्यामुळे आपसूकच नालेसफाईला मदत होत आहे. त्यामुळे अवकाळी शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय असला तरी नालेसफाई करणाऱ्या ठेकेदारांसाठी फलद्रूप ठरत आहे.