Girish Mahajan Tendernama
मुंबई

बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या 'त्या' कंत्राटदारावर काय होणार कारवाई?

कंत्राटदारास तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट केल्याची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची विधान परिषदेत माहिती

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): जिगांव प्रकल्पांतर्गत जिगांव धरणाच्या खालील बाजूस असणाऱ्या रस्ता दुरुस्ती बांधकाम या कामाच्या टेंडर प्रकरणी मे. निलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. नंदुरबार यांनी बोगस कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कंत्राटदाराविरोधात कारवाई करण्यात येऊन या कंत्राटदारास तीन वर्षासाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आल्याची माहिती जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन विधान परिषदेत दिली.

सदस्य अभिजित वंजारी यांनी या संदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, जिगांव प्रकल्पांतर्गत जिगाव धरणाच्या खालील बाजूस असणाऱ्या रस्ता दुरुस्ती कामासाठी १५ कोटी ६३ लाख रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने टेंडर भरताना सादर केलेल्या कागदपत्राबद्दल तक्रार प्राप्त झाली.

या तक्रारीची तत्काळ दखल घेत चौकशी पूर्ण करण्यात आली. या चौकशीत कंत्राटदाराने बनावट अनुभव प्रमाणपत्रे वापरून टेंडर मिळवल्याचे निदर्शनास येताच त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आले असून त्याची ३१ लाख २८ हजार रुपयांची बँक हमीही जप्त करण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री महाजन यांनी या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.