Coastal Road
Coastal Road Tendernama
मुंबई

Good News : अवघ्या 2 ते 3 महिन्यांची प्रतीक्षा; कोस्टल रोड संपूर्णच खुला होणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक बाजू नुकतीच वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे मुंबई महापालिकेचे उद्धिष्ट आहे. या रस्त्यामुळे मुंबईकर नागरिकांची सुमारे 70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये सुद्धा 34 टक्के बचत होणार आहे. 10.58 कि.मी. लांब या सागरी मार्गावर १४ हजार कोटींचा खर्च झाला आहे.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेले मुंबई हे भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक प्रमुख शहर आहे. दक्षिण मुंबईतील परिसर व्यापार उदिमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. सात बेटांनी तयार झालेल्या मुंबईचा भौगोलिक विस्तार उत्तर दक्षिण असा पसरलेला असल्याने येथील देशाच्या मुख्य भागाशी जोडलेले दोन मुख्य रस्ते देखील उत्तर दक्षिण असेच बांधलेले होते. साहजिकच या रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब असे. तथापि मागील काही वर्षांत या रस्त्यांना पूरक असे नवीन रस्ते तयार होत असल्याने रहदारीची ही जटील समस्या कमी होऊ लागली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या ‘अटल सेतू’ नंतर आता वाहतुकीसाठी खुला झालेला मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे 70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये 34 टक्के बचत होईल. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. सुमारे 70 हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल. या हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह आदी प्रस्तावित आहेत. या रस्त्यामुळे इतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षित व जलद प्रवास करता येईल. मुंबईकरांना सागर किनारी अतिरिक्त प्रोमीनेड उपलब्ध होईल. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. या रस्त्याची लांबी 10.58 कि.मी. असून मार्गिकांची रस्त्यावरील संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार असेल. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी 4.35 कि.मी. असून पुलांची एकूण लांबी 2.19 कि.मी.आहे. या मार्गातील मलबार हिल टेकडीच्या खालील दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी 2.072 कि.मी. असून त्याचा अंतर्गत व्यास 11 मीटर आहे. याचे एकूण भरावक्षेत्र 111 हेक्टर इतके असून तीन ठिकाणी आंतरबदल असतील ज्यांची लांबी 15.66 कि.मी. इतकी आहे. 7.5 कि.मी. लांबीचे नवीन पदपथ असून बस वाहतूकीसाठी समर्पित मार्गिका ठेवण्यात आली आहे. समुद्री लाटांपासून बचावासाठी 7.47 कि.मी. लांबीची सागरी तटरक्षक भिंत असणार आहे. या प्रकल्पात अमरसन्स, हाजी अली, वरळी डेअरी, थडाणी जंक्शन, वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

हा प्रकल्‍प मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून 25 फेब्रुवारीपर्यंत याची भौतिक प्रगती 85.91 टक्के तर आर्थिक प्रगती 81.19 टक्के इतकी झाली आहे. बोगदा खणन काम 100 टक्के पूर्ण झाले असून पुनःप्रापणाचे (रिक्लेमेशन) चे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. समुद्रभिंत उभारण्याचे काम देखील पूर्णत्वास आले असून आंतरबदल 87 टक्के तर पुलांचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे.

बोगद्याची वैशिष्ट्ये -
किनारा मार्गावरील पहिला बोगदा खणण्‍याची सुरुवात जानेवारी 2021 मध्‍ये करण्‍यात आली होती. हा बोगदा जानेवारी 2022 मध्‍ये पूर्ण झाला. दुसरा बोगदा खणण्‍याची सुरुवात एप्रिल 2022 मध्‍ये करण्‍यात आली आणि हा बोगदा मे 2023 मध्‍ये पूर्ण झाला. बोगद्याला 375 मि.मी. जाडीचे कॉंक्रीटचे अस्‍तर लावण्‍यात आलेले असून त्‍यावर अग्‍नीप्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत अग्‍नीरोधक फायरबोर्ड लावण्‍यात येत आहेत. भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून आपत्‍कालिन निर्वासनासाठी प्रत्‍येक 300 मीटरवर छेद बोगदे आहेत. उपयोगिता सेवेसाठी बोगद्यांमध्‍ये युटीलिटी बॉक्‍सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे.

प्रकल्पाचा खर्च -
मुंबई किनारी रस्त्यासाठी एकूण बांधकाम खर्च 13983.83 कोटी रुपये अपेक्षित आहे. यामध्ये 9383.74 कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष बांधकाम खर्चाबरोबरच इतर अनुषंगिक खर्चाचा समावेश आहे.

इतर वैशिष्ट्ये -
सागरी रस्ता प्रकल्पातील बोगदा खणणाऱ्या यंत्राने (टीबीएम) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा (व्यास 12.19 मी.) आहे. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायुविजन प्रणालीची योजना करण्यात आली आहे. तसेच भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ पाईलचा पाया बांधून पुलांची उभारणी करण्यात आली आहे. एकाच प्रकल्पामध्ये पुनःप्रापण करुन रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्पातील प्रवाळांचे (कोरल) स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याचे काम यशस्वीरित्या साध्य करण्यात आले आहे.